दोन दिवस जोरदार बरसलेल्या पावसाने अचानक घेतली विश्रांती
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
दोन दिवस जोरदार हजेरी लावल्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे. पावसाच्या आगमनामुळे उत्साहित झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामाला वेग घेतला होता. मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने पेरलेले बियाणे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे पावसाची हुलकावणीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
पाऊस पडत नसल्यामुळे उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत असून, दमट वातावरणामुळे नागरिकही हैराण झाले आहेत. पावसाच्या भरवशावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिकच चिंताजनक ठरत आहे. पेरणीनंतर वेळेवर पाऊस न झाल्यास बियाण्यांची उगवण होणार नाही किंवा ती कमकुवत राहण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
आता शेतकऱ्यांचे लक्ष आकाशाकडे लागले असून, लवकरच दमदार पावसाचे आगमन व्हावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. वेळेत पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मंगेश धामणसे,
दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने यंदा पावसाळा नियमित सुरू झाल्याचे वाटले आणि आम्ही पेरणी पूर्ण केली. मात्र त्यानंतर पाऊसच गायब झाल्याने आता पेरलेले धान्य वाया जाण्याची भीती निर्माण होत आहे.
शेतकरी, खानाव







