कालव्याचे पाणी उशिरा सुटल्याने शेतकर्यांची फरफट
| माणगाव | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील अनेक शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडले आहेत. यावर्षी 40 हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामातील भातपीक उशिरा आलेल्या डोलवहाळ धरणाच्या कालव्याच्या पाण्यामुळे अजूनही शेतात उभे असून, कापणीस तयार नाही. परिणामी, पुढील खरीप हंगामातील भातपिकाची लागवड वेळेत करता येणार की नाही, याबाबत शेतकर्यांमध्ये मोठी अनिश्चितता आहे. यावर्षी पाणी सोडण्याच्या मुदतीनंतर डोलवहाळ धरणातून कालव्यातून पाणी भातशेतीला उशिरा सोडल्यामुळे पिकांचे नियोजन कोलमडले आहे.
रब्बी हंगामासाठी शेतकर्यांनी मेहनतीने भातलागवड केली होती, परंतु वेळेवर पाणी उपलब्ध झाले नसल्याने पिकाची वाढ उशिरा झाली. आता उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात भाताचे पीक शेतात उभे आहे आणि ते अजूनही कापणीस योग्य स्थितीत आलेले नाही. यंदा लवकरच पाऊस असल्यामुळे शेतकर्यांना खरीप हंगामाच्या मशागतीसाठी पुरेसा वेळ मिळणार नाही. त्यातच अवकळी पावसाने माणगाव तालुक्यातील कालव्याच्या पाण्यावरील सुमारे 40 हेक्टर भातपिकाला फटका दिल्याने खरीप हंगामासाठी शेत तयार करणे व त्याच जमिनीवर पुन्हा भातलागवड करणे शेतकर्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह उभारले आहे. यासोबतच, पावसाळा तोंडावर येत असताना रब्बी पीक शिल्लक असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. एका बाजूला दोन पिके घेणार्या शेतकर्याला सध्याच्या पिकाची कापणी करायची आहे, तर दुसरीकडे खरीपासाठी शेतीची पूर्वतयारी करायची आहे. यामुळे आर्थिक व मानसिक तणावात भर पडली आहे. शेतकर्यांच्या मते, जलसंपदा विभागाने वेळेवर पाणी सोडले असते, तर ही परिस्थिती टळली असती. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे शेतकर्यांचे नुकसान होत असून, याबाबत नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक कृषी अधिकार्यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे. वेळेवर उपाययोजना झाली नाही, तर याचा फटका संपूर्ण खरीप हंगामाला बसू शकतो, याबाबत शेतकर्यांना भीती वाटत आहे.
उत्पादनावर परिणाम
रब्बी भाताचे पीक मार्च-एप्रिलमध्ये तयार होते, पण त्या वेळी उन्हाळ्याची तीव्रता, पाण्याची कमतरता आणि मजुरांची टंचाई या गोष्टी पीक काढणीला विलंब घडवतात. दुसरीकडे, खरीप हंगामासाठी मेपासूनच जमिनीची नांगरणी, खते व बियाण्यांची व्यवस्था, पाण्याचा स्रोत निश्चित करणे आदी कामे सुरू करावी लागतात. अशा स्थितीत एकाच वेळी दोन हंगामांची जबाबदारी पार पाडणे म्हणजे आर्थिक व मानसिक ताण निर्माण करणारी गोष्ट ठरते. याशिवाय रब्बी पीक वेळेवर न काढल्यास पुढील हंगामासाठी लागणारी शेतीची मशागत होऊ शकत नाही, परिणामी खरीप पीक वेळेवर लावता येत नाही. याचा थेट परिणाम उत्पादनावर आणि उत्पन्नावर होतो.