23 जणांना घेतले ताब्यात
| डोंबिवली | प्रतिनिधी |
कल्याण शहराच्या मध्यवर्ती परिसरात मुरबाड रोडला असलेल्या महाराजा बार अँड रेस्टॉरंट तथा ताल बारवर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या खास पथकासह महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने धाड टाकून 23 जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान 6 कथित गायिका, 17 पुरूष ग्राहक, बारचा मालक, मॅनेजर आणि वाद्यवृंदाचा वादक अशा 23 जणांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या या कारवाईमुळे ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारबालांना नाचविणार्या बारवाल्यांची धाबे दणाणले आहेत.
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांची धाड पडताच तेथे बसलेल्या आंबटशौकिनांची बोबडी वळली. हा बार शासनाने दिलेल्या परवानगीच्या विहित वेळेपेक्षा जास्त वेळ अर्थात 1.40 पर्यंत चालू असल्याचे आढळून आले. या बारमध्ये 6 महिला गायिका तोडक्या कपड्यांमध्ये अश्लील अंगविक्षेप करत नृत्य करताना, तर या नृत्यांगणांवर मदहोश झालेले मद्यपीही नोटांची उधळण करताना आढळून आले. पोलिसांनी तत्काळ या सार्या दृश्यांचा पंचांसमक्ष ई-साक्ष अॅपमध्ये पंचनामा करून एकूण 17 पुरूष व 6 महिला गायिका वजा नृत्यांगना अशा एकूण 23 जणांच्या विरोधात सरकारतर्फे फिर्याद नोंदवून स्थानिक महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाय कारवाई दरम्यान या बारमधून 28 हजार 980 रूपयांच्या रोकडसह ग्राहकांच्या मनोरंजन व बारबालांच्या अश्लील नृत्यासाठी गाणी वाजविण्याकरिता असलेले मिक्सर, एम्पलीफायर, स्पीकर्स देखिल जप्त करण्यात आले.
कल्याण-शिळ महामार्ग, कल्याण-मलंग रोड आणि काटई-बदलापूर पाईपलाईन महामार्गावर जवळपास डझनभर ऑर्केस्ट्रा बार चालतात. लखलखणारी विद्युत रोषणाई, कानठळ्या बसविणार्या वाद्यवृंद वजा डिजेच्या आवाजामुळे, तसेच रात्रीपासून पहाटेपर्यंत मद्यपी, बारबालांच्या रेलचेलीमुळे अशा बारच्या आसपास राहणार्या रहिवाश्यांनी कित्तीही तक्रारी कुठेही केल्या तरी कोणताही परिणाम होऊ शकत नाही, अशी परिस्थिती असल्याचे त्रस्त रहिवाश्यांनी सांगितले. अशा बारमध्ये शासनाचे नियम पायदळी तुडवले जात असून या बारवरील कारवाईत पोलिसांनी सातत्य ठेवण्याची मागणी परिसरातील रहिवाश्यांकडून केली जात आहे.