। पनवेल । प्रतिनिधी ।
पोलीस असल्याची बतावणी करून पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला मनी लॉड्रिंगप्रकरणी अटक होईल, अशी भीती दाखवून 6 कोटी 29 लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिसांनी पनवेल येथून सापळा लावून आरोपीला अटक केली आहे. तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय 28, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. वाजंत्री हा बांधकाम व्यावसायिक असून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांचा निकटवर्तीय आहे. तसेच त्याची पत्नी पक्षाची कार्यकर्ती आणि गावची सरपंच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वाजंत्री याने पुण्यातील एका ज्येष्ठाला 9 ते 19 नोव्हेंबर 2024 दरम्यान अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फोन करून पोलीस असल्याची बतावणी करत त्यांच्या विरोधात मनी लॉंड्रिंगची केस असल्याचे सांगितले. तसेच चौकशीच्या बहाण्याने डिजिटल अरेस्ट करून ज्येष्ठाला पैसे पाठविण्यास सांगितले. ज्येष्ठाने घाबरून वाजंत्री याला तब्बल सहा कोटी 29 लाख रुपये पाठविले. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ज्येष्ठाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सायबर पोलिसांकडून या गुन्ह्याचा तपास सुरू होता.
तपासादरम्यान, आरोपीच्या बँक खात्यात 11 नोव्हेंबर 2024 रोजी 20 लाखांची रक्कम फिर्यादीच्या खात्यातून आरोपीच्या खात्यात वर्ग झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आरोपीने 90 लाख आणि 20 लाख रुपयांची एफडी केली. हे बँक खाते कोकबन येथील श्री. धावीर कन्स्ट्रक्शन यांचे असल्याचे उघड झाले.
तसेच, आरोपी वाजंत्री हा बांधकाम व्यवसायिक असल्याचे समोर आले. त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने आरोपी वाजंत्री आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे पोहोचले. मात्र आरोपी साथीदारासह तिथून पसार झाले. त्यानंतर आरोपी पनवेलमध्ये असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीनुसार सायबर पोलिसांच्या पथकाने पनवेल येथे सापळा लावून वाजंत्री याला ताब्यात घेतले.
आरोपी तुषार वाजंत्री याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच, वाजंत्रीचा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.