तहसीलदारांचे वन विभागाला निर्देश
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील खोपोली रस्त्यावर असलेल्या पळसदरी ठाकूरवाडी या लोकवस्तीच्या मागे कधीही कोसळू शकतात असे तीन मोठे दगड येऊन थांबले आहेत. ते दगड खाली कोसळल्यास पळसदरी ठाकूरवाडीमध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते. सदर दगड हे वन क्षेत्रात आहेत. त्या ठिकाणी कोणतेही वाहन जाण्याची व्यवस्था नसल्याने वन विभागाने पर्यावरणाला हानी होणार नाही अशा पद्धतीने ते दगड हलवावेत, अशी सूचना कर्जत तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी केली आहे. वन विभाग त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाहन नेण्यास परवानगी देत नसल्याने शेवटी तहसीलदारांनी वन विभागाला ते दगड हटविण्याचे आदेश दिले आहेत.
पळसदरी आदिवासीवाडी येथील वस्तीच्या पाठीमागील टेकडीवरील मोठ्या आंब्याच्या झाडालगतचे तीन मोठे दगड धोकादायक स्थितीत असल्याचे ग्रामपंचायतीने तहसीलदार यांना एप्रिल 2024 मध्ये कळविले आहे. मागील महिन्यात तहसिलदार, गटविकास अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग इ. सर्व संबंधित यंत्रणा व काही ग्रामस्थ यांच्यासमवेत याठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्यात आली. स्थळपाहणीवेळी वनखात्याच्या क्षेत्रातील आंब्याचे झाडालगतचे तीन मोठे दगड धोकादायक स्थितीत असून, ते दगड खालील वस्तीवर अतिवृष्टी वा अन्य नैसर्गिक कारणांमुळे कोसळू शकतात, असे निदर्शनास आले. मात्र, सदरचे क्षेत्र वनक्षेत्र असल्याने संबंधित क्षेत्रात मशिनरी जाण्यासाठी लगतच्या दुसर्या टेकडीवरून पर्यायी मार्ग आहे का? याबाबत शहानिशा करण्यासाठी स्थानीक ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व वनरक्षक यांना स्थळ पाहणी करण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्या ठिकाणी जाण्यासाठी आणि दगड बाजूला सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी वन विभाग कोणत्याही प्रकारचा रस्ता करून देत नाही. तसेच वाहने नेण्यास परवानगी देत नाही.
उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मान्सूनपूर्व तयारी आढावा तसेच आपत्ती प्रतिबंधक पूर्वतयारी आढावा बैठकीत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गटविकास अधिकारी कर्जत व ग्रामविकास अधिकारी पळसदरी यांचेशी समन्वय साधून तातडीने सदरचे दगड हटवावेत, असे निर्देश दिले आहेत.
पळसदरी ठाकूर वाडी ही वस्ती आणि वाडी शासनाच्या जिऑलॉजिकल सर्व्हेमधून दरडप्रवणग्रस्त गावांच्या यादीमध्ये समाविष्ट नाही. मात्र, कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेत असून, आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी वन विभागाला त्यांच्या वन क्षेत्रातील दगड बाजूला करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– डॉ. धनंजय जाधव, तहसीलदार, कर्जत