सांडपाणी सोडल्याने देऊळ वाडी येथील शेती नापीक

शेतकरी हवालदिल

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील देऊळ वाडी येथील एका बिल्डरांकने शेतकऱ्यांच्या हक्काचा रस्ता रोखला आहे. त्याचवेळी स्थानिक पातळीवर गृह प्रकल्पामधील राहणाऱ्या निवासी वस्तीमधील सांडपाणी शेतात सोडण्यात आल्याने शेती नापीक बनली आहे. तालुक्यातील देऊळवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांच्या पिढ्यान्‌‍पिढ्या चालत आलेल्या वहिवाटीचा रस्ता करण्यात आला आहे. देऊळवाडी येथील शेतकरी मंगेश काशिनाथ बडेकर आणि रोहिदास हरिश्चंद्र बडेकर यांची या परिसरात वडिलोपार्जित शेतजमीन आहे. या जमिनीवर जाण्यासाठी पिढ्यान्‌‍पिढ्या बामणोली येथील स.नं. 1/2, 2/1 आणि 3/2 मधून रस्ता सुरू होता. मात्र, संबंधित जमीन मालक आणि बिल्डरांनी या जागेवर संरक्षक भिंत बांधून शेतकऱ्यांचा रस्ता पूर्णपणे बंद केला आहे. बांधकाम व्यावसायिकांनी भिंत बांधून बंद केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रस्ता अडवल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली असून, इमारतींचे सांडपाणी शेतात सोडल्याने सुपीक जमीन नापीक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी न्याय न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा पीडित शेतकऱ्यांनी दिला आहे.

दरम्यान, शेतकरी रोहिदास बडेकर यांनी “इको ग्रीन सोसायटी आणि संबंधित बिल्डरांनी रस्त्याची रुंदीही बेकायदेशीरपणे कमी केली आहे, असा आरोप केला आहे. ज्या ठिकाणी 12 मीटरचा रस्ता असायला हवा होता, तिथे केवळ 10 मीटर रस्ता ठेवला आहे. तसेच मंजूर नकाशाप्रमाणे पार्किंगची सोय न करता नियम धाब्यावर बसवले आहेत. “रस्ता मागण्यासाठी गेले असता बिल्डरांकडून दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले. रस्ता नसल्यामुळे ट्रॅक्टर, नांगर आणि इतर शेतीची अवजारे शेतात नेणे अशक्य झाले आहे. यामुळे सध्याच्या हंगामातील मशागतीची कामे रखडली आहेत. इमारतींमधील सांडपाणी थेट भातशेतीत सोडले जात आहे. यामुळे उभ्या पिकाचे नुकसान होत असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी शेतकरी मंगेश बडेकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय आणि कर्जत तहसीलदार, यांच्याकडे रीतसर अर्ज केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या अर्जाची दखल घेत तहसीलदारांना आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अद्याप प्रत्यक्ष निकाल न लागल्याने शेतकऱ्यांनी आता पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीचे न्यायासाठी दरवाजे ठोठावले आहेत.

Exit mobile version