शेती उद्ध्वस्त करुन टँकरसाठी मार्ग मोकळा
| नेरळ | प्रतिनिधी |
आदिवासी भागातील शेतकरी हिवाळ्यात माळरानावर भाजीपाला शेती करीत असतात.त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त आदिवासी वाडी असलेल्या ताडवाडीमध्ये पिण्याच्या पाण्याचा टँकर विहिरीवर जाण्यास अडचणी आल्या. शेवटी आदिवासी ग्रामस्थांनी पाण्याचा टँकर विहिरीपर्यंत नेण्यासाठी श्रमदान करून रस्ता तयार केला.

कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेऊन स्थानिक आदिवासी महिलांना पाण्याचे नियोजन करावे लागते होते. रात्री बारा तांडवाडीमधील महिला विहिरीवर नंबर लावून पिण्याचे पाणी घरी आणतात. त्यामुळे येथील आदिवासी महिलांनी आ. महेंद्र थोरवे यांची 14 एप्रिल रोजी भेट घेऊन पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली. त्यात पाणीटंचाई कृती आराखड्यात समाविष्ट असलेल्या ताडवाडीमध्ये पाण्याचे टँकर सुरु करण्याची सूचना आ. थोरवे यांनी कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांना केली होती. त्यानंतर 100 घरांची वस्ती असलेल्या ताडवाडीमध्ये शासनाचा टँकर पिण्याचे पाणी घेऊन गेला. मात्र, ताडवाडी येथील विहिरीकडे जाणार्या माळरानावरील रस्त्यात भाजीपाला शेती केली होती. पावसाळा संपल्यानंतर केलेल्या शेतीमधील वाफे हे तसेच ठेवण्यात आले होते, पुढील वर्षी पुन्हा भाजीपाला शेती करताना मेहनत कमी लागावी यासाठी आदिवासी शेतकर्यांनी तीन माळरानावर बनवलेले वाफे तसेच होते.

आदिवासी वाडी ते विहीर ते 300 मीटरचे अंतर हे जवळचे होते, पण 12000 लिटर पाण्याने भरलेला टँकर हा माळरानावरील वाफ्यांमुळे पुढे जात नव्हता. शेवटी पाणीपुरवठा यंत्रणा पाहणारे कर्जत पंचायत समितीचे अधिकारी चिंतामण लोहकरे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक गोवर्धन नखाते यांनी आदिवासी ग्रामस्थांना ट्रँकर जाण्यासाठी रस्ता करावा लागेल अशी सूचना केली. त्यानंतर 25 महिलांनी वाडी मध्ये जाऊन टीकाव फावडे आणली आणि पाण्याचा टँकर विहिरीपर्यंत जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी श्रमदान केले.त्यानंतर विहिरी मध्ये पाणी ओतण्यात आले. दिवसाआड तांडवाडीमध्ये शासनाच्या टँकरमधून पाणी आणून विहिरीमध्ये ओतले जात आहे.