पावसाने मारली दडी

शेतीची कामे रखडली
शेतकरी हवालदिल
पोयनाड | वार्ताहर |
यावर्षी पावसाने सुरुवात दमदार केली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. कोकणात भात, वरी व नाचणी पिकाच्या पेरणीसाठी पाऊस उत्तम झाला. शेतकर्‍यांना मनाप्रमाणे पेरण्या करता आल्या. पण, गेल्या आठवड्यापासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे भातलावणी, वरी, नाचणी आवटणीची कामे रखडली आहेत.

कोकणातील भात, वरी, नाचणी ही पिके एक महिन्याच्या कालावधीनंतर लावणी व आवटणी योग्य होतात. पिकांचीउंची वाढवण्यासाठी शेतकरी खताचे साधारण दोन हप्ते देतो. पाऊस सुरळीत सुरू आहे, म्हणमन शेतकर्‍याने भातरोपांना वाढीसाठी खत वापरले. परंतु, जी कमी पाण्याची भातखाचरे आहेत, अशा ठिकाणची भातरोपे पाऊस नसल्यामुळे धोक्यात आली आहेत. आणखी आठ दिवस पाऊस पडला नाही तर भातरोपे करपण्याचा धोका आहे. खारजमिनीतील भातरोपे करपून जातील.

सध्या कोकणात पानथळ जमिनीतील भातलावणीची कामे सुरू आहेत. पण, पावसाअभावी कमी पाण्याच्या जमिनीमधील भातरोपे लावणीची कामे रखडली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
डोंगरमाथ्यावर वरी, नाचणीची पिके घेतली जातात. पाऊस नसल्यामुळे या पिकांच्या अवटणीची कामे थांबली आहेत. येत्या पाच-सहा दिवसात पाऊस पडला तर शेतकर्‍याला दिलासा मिळेल व पाऊस लांबला तर शेतकर्‍यांची चिंता वाढणार आहे.

Exit mobile version