कीड पडण्याची भीती शेतकरी चिंतातूर
| म्हसळा | वृत्तसंस्था |
गेल्या आठ ते दहा दिवसापासून म्हसळा तालुक्यात पावसाने दडी मारल्याने भाताचे पीक धोक्यात आले असून पिकांवर कीड पडण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला आहे. श्रावण महिना सुरु झाल्यापासून पावसाने तालुक्यात पूर्णपणे दडी मारली असून जर पिके चांगली टीकायची असल्यास पाऊस पडणे अत्यावश्यक आहे. पिकावर कीड पडल्यास कृषी विभागाकडून शेती नियंत्रित राखण्यासाठी शेतकऱ्यांने कोणत्या उपाययोजना यासाठी मार्गदर्शन देणे अत्यावश्यक आहे.
म्हसळा तालुक्यात खरीप हंगामातच शेती केली जाते, शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला असून संकरीत बियाणाकडे जास्तीत जास्त कल आहे. अश्याप्रकारच्या बियाणांपासून अधिक उत्पन्न मिळते परंतू पावसाने दडी मारल्याने किडिंचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता अधिक प्रमाणात निर्माण झाली आहे. जुलै महिन्यात चांगला पासून झाल्याने शेतकरी वर्गात समाधान होते, परंतू श्रावणात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा आनंद हिरावून घेतल्याचे वातावरण तालुक्यात दिसून येते. आताही चांगला पाऊस झाल्यास खोडकीडा झालेली पिके पुन्हा बहरतील असा विश्वास शेतकऱ्यांकडून ऐकवयास मिळते.
तालुक्यातील एकूण क्षेत्रापैकी 1366 हेक्टर क्षेत्रात भात, 133. 40 हेक्टर क्षेत्रात नाचणी, 6. 80 हेक्टर क्षेत्रात वरी तर 2 हेक्टर क्षेत्रात तूर चे पीक घेतले जाते. पावसाचा अनियमित पणा, केल्टी, रानडुकरे यांचा दिवसेंदिवस वाढणारा उपद्रव यामुळे शेतकरी पूर्णपणे असमाधानी असल्याचे चित्र दिसते पूर्वी म्हसळा तालुक्यात नाचणी, वरी आणि भाताचे कोठार म्हणून जिल्ह्यात नाव होते, परंतू अलीकडच्या 10 वर्षाच्या काळात अनेक अडचणींमुळे शेतीकडे दुर्लक्ष होत असून वरी आणि नाचणी सर्वसामान्य नागरिकांना दिसेनाशी झाली आहे. शासनाचे कृषी विषयक धोरण ठाम नसल्यामुळे सर्वत्र नाराजीचा सूर पसरला आहे.