जलद रेल्वे गाड्या आता माणगावात थांबणार

रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश

| माणगाव | प्रतिनिधी |

रेल्वे प्रशासनाने लांब पल्यांच्या तीन एक्सप्रेस गाड्यांना माणगावमध्ये थांबा दिल्याने प्रवाशातून आनंद व्यक्त होत आहे. याबाबत माणगाव तालुका रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी निवेदनाद्वारे लक्ष वेधले होते. त्या मागणीला आता यश आले आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील दक्षिण रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव रेल्वे स्थानकावरून अनेक लांब पल्यांच्या रेल्वे गाड्या ये-जा करतात. मात्र येथील प्रवाशांना या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा नसल्याने उपयोग होत नव्हता. त्यामुळे प्रवासी वर्गातून प्रचंड नाराजी पसरली होती. या रेल्वे स्थानकातून मोठ्या संख्येने नागरिक प्रवास करतात. कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासनाने विविध सुधारणा केल्या असून या मार्गावरून दक्षिणेसह विविध राज्यात एक्सप्रेस रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. मात्र येथे थांबा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. माणगाव येथून महाड औद्योगिक क्षेत्र, विळे भागाड औद्योगिक क्षेत्र असून छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड किल्ले ही राजधानी जवळच आहे. नजीकच्या काळात येवू घातलेला दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरीडोर, अंतराष्ट्रीय दिघी पोर्ट त्याचबरोबर समुद्र किनारपट्टीमुळे पर्यटक, विद्यार्थी, अभ्यासक, व्यापाऱ्यांसह अनेक प्रवाशाना आता प्रवास करणे सोपे जाणार आहे.

कोणत्या गाड्या थांबणार
तिरुअनंतपुरम-वेरावल एक्सप्रेस, नागरकोईल-गांधीधाम एक्सप्रेस आणि भावनगर-कोचुवेली एक्सप्रेस या गाड्यांना माणगाव येथे थांबे देण्यात आले आहेत. या बाबत रेल्वे प्रशासनाने अधिसूचना काढली असून याची अमलबजावणी 19 ऑक्टोबरपासून केली जाणार आहे. प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन माणगाव तालुका रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष रमेश जैन यांनी केले आहे.
Exit mobile version