नियुक्तीसाठी अधीपरीचारिकांचे पुन्हा उपोषण सुरू

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अधिपरिचारिका प्रशिक्षणास 2017 पासून सुरुवात करुन 2019-20 मध्ये उत्तीर्ण झालेल्या बंधपत्रात सर्व अधिपरिचारिकांना 18 महिन्याचे नियुक्ती पत्र मिळावे या मागणीसाठी स्थगित करण्यात आलेल्या उपोषणाला पुन्हा एकदा समाजक्रांती आघाडीच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष बी.जी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु करण्यात आले आहे. यात प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या अधिपरीचारीकाही सहभागी झाल्या आहेत. अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात ऑगस्ट 2017 पासून जीएनएम प्रशिक्षणास 15 विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. 2019-20 मध्ये त्यांनी आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. त्यानंतर उत्तीर्ण झालेल्या बंधपात्र अधिपरिचारिकांना संबंधित आरोग्य अधिकारी व कार्यालय येथे वारंवार भेट देऊन अर्ज-विनंत्या केल्या. पण नियमाप्रमाणे 18 महिन्यांचे नियुक्ती आदेश मिळालेले नाहीत. या संदर्भात समाजक्रांती आघाडीच्या वतीने गेल्या महिन्यात आंदोलन करण्यात आले होते. मात्र प्रशासनाच्या विनंती नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. मात्र महिन्याभरात प्रशासनाकडून कुठलीच हालचाल झाली नसल्याने पुन्हा बेमुदत उपोषण सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मेहनत घेऊन अभ्यास करुन आम्ही उत्तीर्ण झालो आहेत. परंतु,आज आम्ही बेरोजगार आहोत. प्रशिक्षण चालू असतानासुद्धा करोना महामारीच्या आपत्तीतदेखील आम्ही रुग्णसेवेचे काम केले आहे. मात्र,आता नियुक्ती मिळत नसल्याने आम्ही आर्थिक व मानसिक तणावात आहोत. त्यामुळे नाईलाजाने आमच्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ ओढवली आहे. त्यामुळे आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्याचा हे आंदोलन करत असल्याचे यावेळी उपस्थित अधिपरिचारिकांनी सांगितले. यात बी जी पाटील यांच्यासह भाग्यश्री पाटील, भाविका भोईर, सिद्धेश्‍वरी गायकवाड, सपना माने, दिक्षीत मेस्त्री, प्रणाली चांदोरकर, अशिष पाखड, शिवानी जाधव, प्रणाली भोसले, प्रियांका शिद आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे पुणे आणि लातुर येथील प्रशिक्षण पुर्ण केलेल्या अशाच अधिपरिचारिकांना नियुक्ती पत्र देण्यात आलेली आहेत. त्यामुळे सर्वांना समान न्याय मिळावा या दृष्टीने राज्य शासनाने कार्यवाही करावी. शासनाने प्रशिक्षण पुर्ण केलेल्या अधिपरिचारिकांना त्वरित 18 महिन्यांचे नियुक्ती पत्र द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

Exit mobile version