। अलिबाग / । भारत रांजणकर ।
मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रेपोली गावाजवळ हा भीषण अपघात झाला असून भरधाव ट्रक आणि एको कारची समोरासमोर धडक झाली. यात तब्बल 9 प्रवासी ठार झाले असून एक 4 वर्षांचा मुलगा आश्चर्यकारकरित्या बचावला असल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीतील रेपोली गावाजवळ आज (गुरुवार, 19 जानेवारी) रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. इको कार आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. यात इको कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.
मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या मुंबई गोवा महामार्गाचे बांधकाम मागील कित्येक वर्षांपासून संथ गतीने सुरु आहे. तसेच सातत्याने या रस्त्यावर अपघात होत असून अद्यापही शासन प्रशासनाला जाग आलेली नाही, त्यामुळे अजून किती नागरिकांचे बळी गेल्यावर सरकार जागे होणार, असा सवाल सामान्य नागरिक करत आहेत.