सुवासिनींनी लुटले सौभाग्याचं वाण
तारकांची उपस्थिती मान्यवरांचा सहभाग
पीएनपी नाट्यगृहात एकवटली नारीशक्ती
| अलिबाग | प्रतिनिधी |
अमाप उत्साहात आणि परंपरेला साजेल अशा वातावरणात, मान्यवर कलावंतांच्या उपस्थितीतअलिबाग येथे पीएनपी नाट्यगृहाच्या प्रांगणात बुधवारी ( 18 जानेवारी) कृषीवल हळदीकुंकू सोहळा साजरा झाला. हजारो महिलांनी संक्रांतीचे हळदीकुंकवाचे वाण लुटत आनंदोत्सव साजरा केला.सोनी वाहिनीवरील विविध मालिकांमध्ये भूमिका साकारणार्या कलावंतांना प्रत्यक्ष पाहून महिलाही सुखावून गेल्या.28 व्या वर्षात पदापर्ण करणार्या या विक्रमी सोहळ्यात महिलांना सौभाग्याचे वाण लुटण्याची संधी शेकापच्या महिला जिल्हा आघाडीप्रमुख तथा कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालक चित्रलेखा पाटील यांनी प्राप्त करुन दिली आहे.
या हळदीकुंकू कार्यक्रमास सोनी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध आशीर्वाद तुझा एकविरा आई फेम मयुरी वाघ, तसेच जीवाची होतिया काहिली फेम प्रतिक्षा शिवणकर आणि राज हंचनाळे, श्रुतकिर्ती सावंत त्याचप्रमाणे प्रतिशोध झुंज अस्तित्वाचा फेम पायल मेमाणे व अक्षय वाघमारे आदी कलाकार उपस्थित होते.या कलावंतांना प्रत्यक्ष व्यासपीठावर पाहून उपस्थित महिलाही भारावून गेल्या.याशिवाय या कार्यक्रमास माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी नगराध्यक्षा सुनिता नाईक,अलिबाग अर्बन बँकेच्या चेअरमन सुप्रिया पाटील, माजी जि.प. सदस्या भावना पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, अॅड.नीता पाटील,शैला पाटील, आंबेपूरच्या सरपंच सुमना पाटील, माजी उपनगराध्यक्षा अॅड.मानसी म्हात्रे, डॉ साक्षी पाटील, साधना पाटील, डॉ.प्रणाली पाटील, जनता शिक्षण मंडळाच्या नागाव ग्रा.पं.सदस्य हर्षदा मयेकर, नगरसेवीका वृषाली ठोसर, संजना किर यांच्यासह राजकीय,सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर महिलांनी या सोहळ्यास उपस्थिती लावली.
या हळदीकुंकू कार्यक्रमामुळे महिलांना एक वेगळीच पर्वणी मिळाल्याचे दिसून आले. कृषीवलतर्फे गेली 27 वर्षांपासून आयोजित केला जाणारा दिवस मानाचा सौभाग्याचा हळदीकुंकू सोहळा असल्याने अलिबाग तालुक्यातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात कलावंतांनी महिला प्रेक्षकांशी संवाद साधत मालिकेतील कथेचा उलगडा केला.
चित्रलेखा पाटील यांनी मोठया प्रमाणावर आलेल्या अलिबागकर सुहासिनींना धन्यवाद दिले. तसेच सोनी टिव्हीचे आवर्जून आभार मानले. आपल्या आवडत्या तारकांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी हितगूज साधण्यासाठी सर्वांनी एकच गर्दी केली होती. जो तो संधी मिळेत तसे सेल्फीमध्ये आपल्या सोबत तारकांना छायाबद्ध करण्याचे प्रयत्न करीत होते. पुरोगामी युवक संघटनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष संगितकार विक्रांत वार्डे यांनी सुत्रसंचालन केले.
उखाणे आणि फुगड्यांनी खुलला सोहळा
उपस्थित सुहासिनींनी व्यासपीठावर येत एकाहून एक असे सरस उखाणे घेत कार्यक्रमाला चारचाँद लावले. यावेळी अनेकींनी कृषीवलच्या हळदीकुंकूचे कौतुक देखील उखाण्यांमधून केले. तर तारकांसोबत फुगड्यांचा फेर धरत कार्यक्रमात धम्माल उडविली. मयुरी वाघ, श्रुतकिर्ती सावंत, पायल मेमाणे, प्रतिक्षा शिवणकर यांनी अनेक महिलांसोबत फुगडी खेळली. यात कहर केला तो राज हंसनाळे याने, त्याने देखील फुगडी खेळत महिलांची मने जिंकली.
अर्जून-रेवतीच्या नृत्याने चढला रंग
जीवाची होतिया काहिली फेम रेवती अर्थात प्रतिक्षा शिवणकर आणि रांगडा अर्जून म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका राज हंचनाळे या दोघांनी मालिकेच्या टायटल साँगवर नृत्य सादर करीत या सोहळयाला रंग चढवला. त्यानंतर या दोघांची फुगडी देखील लक्षवेधी ठरली.