अलिबाग तालुक्यातील झिराड येथील घटना
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील झिराड येथील घरमालकासह त्याच्या पत्नीवर एका भाडेकरूनेच जीवघेणा हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि.20) दुपारी घडली. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हल्लेखोराला पोलिसांनी अवघ्या काही तासातच अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अशोक मंडळ असे या भाडेकरूचे नाव आहे. हा परराज्यातील असून गेल्या काही महिन्यांपासून अरविंद झिराडकर यांच्या मालकीच्या खोलीमध्ये भाड्याने राहत आहे. त्याला सतत दारु पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या घर मालकाने त्याला खोली खाली करण्यास सांगितले. याचा राग धरून अशोक मंडळ याने लोखंडी पट्टीने घरमालकासह त्याच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हा प्रकार केला. या जिवघेण्या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि.20) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास झिराडमधील आदर्शनगर येथे घडली.
अरविंद झिराडकर आणि अर्चना झिराडकर असे या जखमींची नावे असून, अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले आहे.
या घटनेचे गांभीर्य ओळखून मांडवा सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई यांच्या मार्गदर्शनाखाली मारेकऱ्याचा शोध घेण्यात आला. त्याला काही तासातच अटक करण्यात आली. नोकरी व्यवसायनिमित्त वेगवेगळ्या राज्यातून जिल्ह्यातून नागरिक अलिबाग तालुक्यात येत आहेत. भाडेकरूंची पोलीस पडताळणी प्रत्येक घर मालकाने करून घेणे गरजेचे आहे. स्वतःच्या आणि परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कार्यवाही प्रत्येकाने करावी असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक भोई यांनी केले.