एमएमआरडीएचे फलक लागले झळकू
| नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान या पर्यटन स्थळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून विकासकामे केली जात आहेत. त्यातील काही रस्त्यांची आणि प्रेक्षणीय स्थळांच्या सुशोभीकरणाची कामे एमएमआरडीएकडून पूर्ण झाली आहे. मात्र विकासकामे पूर्ण झालेल्या कामांच्या ठिकाणी माथेरान शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून फक्त स्वतःचे नावाचे बोर्ड लावले आहेत. दरम्यान, माथेरान मधील असंख्य रस्त्यांची, पॉईंटच्या सुशोभीकरणाची कामे होणार असल्याने माथेरान शहरात आता सर्व फलकांवर एमएमआरडीएचे नाव दिसणार आहे, त्यामुळे माथेरान या पर्यटनस्थळाची ओळख पुसून जाणार आहे. माथेरान हे पर्यटन स्थळ मुंबई महानगर प्रदेशात येत असून माथेरान मधील विकासकामे एमएमआरडीएच्या निधीमधून केली जात आहेत. आतापर्यंत किमान 250 कोटींचा निधी प्राधिकरणाने माथेरानच्या विकासासाठी दिला आहे. मात्र असे असताना हा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मिळाला असून एमएमआरडीए हे राज्याच्या नगरविकास खात्याच्या अंतर्गत येणारे विभाग असल्याने नगरविकास विभाग यांचा अंकुश एमएमआरडीएवर आहे. त्याचवेळी एमएमआरडीए हि राज्य सरकारच्या अंतर्गत काम करणारी यंत्रणा असल्याने माथेरान सह मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात प्राधिकरणाच्या माध्यमातून विकासकामे होत असतात. मात्र माथेरान हे जगाच्या पाठीवरील वाहनांना बंदी असलेले एकमेव पर्यटन स्थळ असून माथेरानने हो ओळख जपली आहे. असे असताना आता एमएमआरडीएमुळे माथेरानची ओळख पुसटली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. माथेरानमध्ये केल्या जात असलेल्या विकासकामांच्या नावाच्या पाट्या एमएमआरडीएकडून लावल्या जात आहेत. या फलकांमुळे माथेरानमध्ये नव्याने आलेल्या पर्यटकांना आपण मुंबईत आहोत कि काय असा भास होऊ लागला आहे.
माथेरानमध्ये भविष्यात माथेरान पालिकेत 150 कोटींची विकासकामे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण करणार आहे. त्यामुळे त्या सर्व ठिकाणी उद्या एमएमआरडीए असे नाव दर्शनी भागात दिसून येणार आहे. पण त्यावेळी त्या फलकांवर केवळ एमएमआरडीए असे लिहिलेले असणार आहे आणि त्या फलकांवर माथेरान गिरीस्थान नगरपरिषद असे नाव दिसणार नाही. त्यामुळे आपण माथेरान पर्यटन स्थळी आहोत की एमएमआरडीए प्रदेशमध्ये आहेत हेच समजून येणार नाही. त्यामुळे एमएमआरडीए माथेरानमध्ये त्यांच्या नावाच्या पाट्यांमुळे माथेरानची ओळख पुसटून एमएमआरडीए प्रदेश अशी तर करणार नाही ना? अशी भीती देखील व्यक्त होत आहे.
- माथेरानमध्ये आम्ही एमएमआरडीएचा निधी वापरून विकासकामे करीत असल्याने एमएमआरडीएची नावे असणारे बोर्ड लावले आहेत. मात्र माथेरान या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाचे नाव पुसटण्याचे कोणताही हेतू नाही. आम्ही यापुढे त्या फलकानावर माथेरान गिरिस्थान नगरपरिषद असे देखील लिहून चूक सुधारण्याचा प्रयत्न करू. – अरविंद धाबे, कार्यकारी अभियंता, एमएमआरडीए
- आम्ही हि बाब आमच्या नजरेस पडताच आणि नागरिकांनी त्याबद्दल सूचित करताच एमएमआरडीएचे ठेकेदार आणि अभियंता यांच्या नजरेस आणून दिली असून त्या बोर्डांवर माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेचा लोगो आणि नाव असलेच पाहिजे अशी पालिकेची भूमिका आहे. – सुरेखा भणगे, मुख्याधिकारी, प्रशासक माथेरान गिरिस्थान नगरपरिषद