बजाज ऑटोचे चेअरमन आणि ज्येष्ठ उद्योजक राहुल बजाज यांचे व्यक्तिमत्त्व अन्य भारतीय उद्योजकांत विलक्षण उठून दिसायचे आणि वेगळे ठसायचे. त्यांना बोलताना ऐकणे हा एकाच वेळी मनापासून बोलणार्या शहाण्या माणसाचा अनुभव असायचा त्याचबरोबर त्यांच्यातील अस्वस्थ अँग्री यंग मॅन ही दिसायचा. याचे मुख्य कारण हेच असावे की आपण उद्योजक आहोत, आपला उद्योग पुढे कसा जाईल यावर लक्ष ठेवून त्याच्या आड येणार्या, नुकसानकारक ठरु शकणार्या वादात विनाकारण पडू नये, असे वाटण्याच्या परंपरेत ते बंडखोरच होते असे म्हणायला हवे. कारण, ते कोणाचाही मुलाहिजा न ठेवता जे त्यांना वाटते ती बाब ते स्पष्टपणे, कोणताही आडपडदा न ठेवता बोलत. हे त्यांचे वैशिष्ट्य अगदी शेवटपर्यंत दिसून आले. त्यांनी जी भूमिका घेतली, त्याची बाजू ते कायम हिरीरीने मांडत राहिले. त्यामुळे ते अनेक उद्योजकांप्रमाणे प्रसारमाध्यमांपासून लांब किंवा सोयीचे सुरक्षित अंतर राखून वावरले नाहीत तर जाहीर कार्यक्रम ते टीव्हीवरील वादळी चर्चा यात ते सतत सामील राहिले. अलिकडे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच्या जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी, आम्ही तुमच्यावर टीका केली तर तुम्हाला चालेल याबद्दल मला खात्री नाही; काँग्रेसच्या काळात आम्ही कोणावरही टीका करू शकायचो, असे ते स्पष्टपणे म्हणाले होते. तसेच, ते पूर्वीही तितकेच स्पष्टोक्ते होते. मात्र त्यांच्या बोलण्यात किंवा राजकारण्यांवरील टीकेत कधी कर कमी करायला हवा आदी गोष्टी नसायच्या. त्यांनी केवळ वादासाठी वाद म्हणून नुसत्या चर्चा केल्या नाहीत, तर बजाज ऑटोच्या निमित्ताने एका उद्योगाला महान संस्थेत रुपांतरीत केले. त्यांची व्यावसायिक मूल्ये उच्च दर्जाची असल्यामुळेच ते म्हणू शकत की, मी घाबरत नाही, मला घाबरण्याची गरज नाही. मी रात्री व्यवस्थित झोपतो. त्यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहताना ज्येष्ठ उद्योजक हर्ष गोयंका यांनी पाठीच्या ताठ कण्याची एक्सरे प्रतिमा टाकून ट्वीट केले की असा ताठ कणा असलेला एकमेव उद्योजक म्हणजे राहुल बजाज. सवलती मिळवण्यापासून मार्ग सुकर करण्यापर्यंत अनेक प्रकारच्या उपकारांची सोय करून घेण्यासाठी उद्योजक सरकारपुढे वाकलेले असतात, या प्रतिमेवर त्यांनी जबरदस्त प्रहार केला होता. करसवलती आदींच्या मागे जाण्यापेक्षा महान संस्थांची उभारणी करा, असा त्यांचा सल्ला असायचा. त्याद्वारे त्यांनी अनेक उद्योजकांना घडविले देखील. या सार्यांची मुळे त्यांचे आजोबा जमनालाल बजाज यांच्या संस्कारात रुजलेली असू शकतात. गांधीवादी उद्योजक म्हणून ते ओळखले जात आणि महात्मा गांधी त्यांना आपला पाचवा पुत्र मानत. राहुल बजाज हेही हीच मूल्ये स्वीकारून पुढे गेले. कोलकाता येथे जन्मलेले राहुल बजाज भारतात पदवीधर बनल्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. तेथे त्यांनी कायद्याची तसेच प्रतिष्ठित हार्वर्ड विद्यापीठातून एमबीएची पदवी मिळवली. त्यांनी बजाज स्कूटरला देशातील लोकप्रिय ब्रँड बनवला. त्यांची ऐंशी, नव्वदच्या दशकातील ‘हमारा बजाज’ ही जाहिरात मोहीम त्यांच्या मूल्यांशी जोडली गेल्याने ती आजही लोकांना आठवते. त्यांच्या चेतक या स्कुटर ब्रँडसाठी आठ ते दहा वर्षांचे वेटिंग असायचे आणि त्याचे पैसे आगावू भरून त्याची नोंदणी करावी लागायची. ही नोंदणीही डॉलरमध्ये करावी लागायची. चेतक स्कुटरची आठ ते दहा हजाराच्या किंमतीवर लोक दोन ते चार हजार रुपये जास्ती देऊन विकत घेण्यास तयार असायचे. आजही लोकांकडे या स्कुटर्स टिकवून ठेवलेल्या दिसतील. त्यांनी आपल्या संस्थेला आपल्या उत्कृष्ट उत्पादनाच्या माध्यमातून महान केले आणि त्याला आर्थिकदृष्ट्या सशक्त केले. जेव्हा भारतातच कारखाना काढणे आणि चालवणे आव्हानात्मक होते तेव्हा त्यांनी परदेशात कारखाने काढले. ते ज्या संस्थांशी जोडले गेले, त्या संस्था त्यांनी मूल्यात्मकदृष्ट्या तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम केल्या. आज सगळीकडे राष्ट्रवाद हा शब्द प्रचलित आहे, पण तो त्यांनी आपल्या हयातभर पाळला. भारतीय उद्योग परदेशी उद्योगांशी स्पर्धा करण्याच्या परिस्थितीत नाही, म्हणून त्यांनी खाजगीकरण आणि जागतिकीकरणाला विरोध केला होता. तसेच, अशोक लेलँड हा ट्रक व्यवसाय खरेदी करण्याचा प्रयत्नही केला होता. दोन्हीत त्यांना अपयश आले. तरी दुःख असो वा विषाद. त्यांच्या जे मनात आहे ते ओठांत येण्याचे काही थांबले नाही. तसेच, त्यांचा साधेपणाही एक दुर्लक्षित राहिलेला पण मूळ संस्कारांशी नाते सागणारा एक पैलू होता. त्यांनाविनम्र आदरांजली!






