। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल आणि आसपासच्या परिसरात भुरट्या चोरांनी थैमान घातले आहे. यामध्ये महिला चोरदेखील सातत्याने गर्दीच्या ठिकाणी आपला डाव साधत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, विचुंबे येथील आठवडा बाजारात दोन महिला चोरांना चोप दिल्याची घटना घडली आहे.
पनवेल परिसरातील विचुंबे गावात आठवडा बाजार भरतो. या आठवडा बाजारात तुफान गर्दी होती. यावेळी 2 चोरट्या महिलांनी एका लहान बाळाच्या गळ्यातील काळ्या धाग्यात ओवलेले सोन्याचे लॉकेट आणि एका महिलेच्या गळ्यातील दागिन्यांवर डल्ला मारला. मात्र, वेळीच ही बाब आठवडा बाजारातील अन्य ग्राहकांच्या लक्षात आली. त्यावेळी या दोन्ही चोरट्या महिलांना आठवडा बाजारात आलेल्या अन्य महिलांनी भर बाजारात चांगलाच चोप दिला. तसेच, पुन्हा चोरी करणार नाही असे वदवून घेतले. यावेळी चोरी केलेले महिलेच्या गळ्यातील दागिने चोरट्या महिलांनी परत केले मात्र बाळाचे लॉकेट सापडू शकले नाही. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी खबरदारी घेण्याचे आवाहन विशेषतः महिलांना करण्यात येत आहे.