ग्रामस्थांकडून दुरुस्तीची मागणी
। सुधागड-पाली । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील अत्यंत दुर्लक्षित भागांमध्ये माणगांव बु. ग्रामपंचायत विभागातील पावसाळावाडी गावाचा समावेश आहे. पावसाळावाडी गावाला आणि आदिवासीवाडीला जोडणारा रस्ता दोन-तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. परंतु, आता या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, या रस्त्यावरून चालणे देखील अवघड झाले आहे.
या रस्त्यावरून जाताना दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेकदा दुचाकीचा अपघात होऊन अनेक जणं जखमी देखील झाले आहेत. या रस्त्याचा पृष्ठभाग पूर्णपणे निखळला असून, मोठे दगड आणि माती सर्वत्र विखुरलेली आहे. ग्रामस्थांनी पावसाळावाडी रस्त्याच्या समस्यांबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. परंतु, संबंधित अधिकार्यांकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने स्थानिक आणि प्रवासी वर्गातून प्रचंड नाराजीचे सुर उमटत आहेत.