| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
फिफा विश्वचषक 2026 स्पर्धा आता सर्वात रोमांचक आणि निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. प्रथमच या स्पर्धेत 48 संघानी भाग घेतला होता. यापैकी 40 संघाचा प्रवास संपला आहे तर फक्त 8 संघ विजेतेपदाच्या शर्यतीत कायम आहेत. ट्रॉफीच्या रेससोबतच गोल्डन बूट पुरस्कारासाठीची शर्यतही रंगली आहे. किलियन एमबाप्पे, लिओनेल मेस्सी आणि अर्लिंग हालंड यांच्यात हा पुरस्कार जिंकण्यासाठी तीव्र स्पर्धा सुरू आहे.
सध्या लिओनेल मेस्सी आणि किलियन एमबाप्पे हे शर्यतीत आघाडीवर आहे. त्यामुळे गोल्डन बूटसाठीची शर्यत खूपच रोमांचक झाली आहे. सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बूट तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडूंना सिल्व्हर आणि ब्राँझ बूट पुरस्कार दिले जातात.
अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी सध्या आठ गोल आणि एक असिस्ट, फ्रान्सचा किलियन एमबाप्पे आठ गोल आणि दोन असिस्टसह प्रथम स्थानी आहेत. नॉर्वेचा अर्लिंग हालंड दुसऱ्या स्थानावर असून त्यानेही सात गोल केले आहेत. जर दोन किंवा अधिक खेळाडूंचे गोल समान असतील, तर विजेता असिस्टच्या संख्येनुसार ठरवला जातो. इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन सहा गोलांसह तिसऱ्या स्थानी आहे. उपांत्यपूर्व फेरीत, हे तिन्ही खेळाडू आपल्या संघांना उपांत्य फेरीत पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करतीलच, पण त्याचबरोबर गोल करून शर्यतीत टिकून राहण्याचाही प्रयत्न करतील.
अर्जेंटिनाने इजिप्तविरुद्धच्या मागील सामन्यात 2-0 ने पिछाडीवर असूनही, शेवटच्या क्षणी एक दमदार पुनरागमन करत 3-2 असा विजय मिळवला आणि उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. लिओनेल मेस्सीचा तिसरा गोल अर्जेंटिनाच्या विजयात निर्णायक ठरला. या गोलमुळे त्याने स्पर्धेच्या गोल्डन बूटच्या शर्यतीत पुन्हा आघाडी घेतली आहे.
लिओनेल मेस्सीला अद्याप गोल्डन बूट जिंकता आलेला नाही. 2022 च्या मागील विश्वचषकात, मेस्सीने सात गोल करून दुसरे स्थान पटकावले होते. तर दुसरीकडे, किलियन एम्बाप्पेने कतारमध्ये 2022 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेत आठ गोलांसह हा पुरस्कार जिंकला. हॅरी केनने 2018 मध्ये सहा गोलांसह हा पुरस्कार जिंकला होता आणि कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिग्जनेही 2014 मध्ये सहा गोलांसह गोल्डन बूट जिंकला होता. त्यामुळे, या वर्षी लिओनेल मेस्सीला हा पुरस्कार जिंकण्याची मोठी संधी आहे.
फिफा विश्वचषक स्पर्धा; आता गोल्डन बूटची शर्यत
