जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांना सल्ला; शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली कैफियत
| रायगड | प्रतिनिधी |
म्हसळा तालुक्यातील केल्टे गावातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या खोती जमिनींची मोजणी व हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेत नियमबाह्य प्रकार झाल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांची भेट घेतली. यावेळी मोजणी अथवा जमीन व्यवहार नियमबाह्य व चुकीच्या पद्धतीने झाल्याचे आढळल्यास, खोटी कागदपत्रे अथवा खोटी कामे करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसात तक्रार करून गुन्हे दाखल करण्याचा सल्ला जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
केल्टे गावातील शेतकऱ्यांनी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात खोती जमिनींच्या मोजणी व हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. अनेक शेतकऱ्यांना मोजणीपूर्वी कायदेशीर नोटीस देण्यात आली नसल्याचे, तर काही प्रकरणांमध्ये मोजणी पूर्ण झाल्यानंतर नोटीस देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित अभिलेखांमध्ये चुकीचे मोबाईल क्रमांक नोंदविणे, काही शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीत त्यांना माहिती न देता हद्द कायम करणे, हद्द कायम आदेशांमध्ये सही, शिक्का अथवा आवश्यक प्रमाणिकरणाबाबत प्रश्न निर्माण होणे, तसेच संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या प्रकरणातील सर्व मोजणी नोटिसा, उपस्थिती नोंद, पंचनामे, हद्द कायम आदेश, नकाशे तसेच संबंधित इतर कागदपत्रांची स्वतंत्र तपासणी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत हद्द कायम करण्याच्या पुढील कार्यवाहीसह जमिनीच्या नोंदींमध्ये कोणताही बदल करू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.
केल्टे गावातील काही जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांबाबतही शेतकऱ्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नियमबाह्य मोजणी, चुकीची कागदपत्रे किंवा बनावट प्रक्रियेच्या आधारे जमीन व्यवहार करण्यात आले असतील तर संबंधित व्यक्तींची चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जमिनींच्या हक्कांवर परिणाम करणाऱ्या अशा प्रक्रियेत संबंधित जमीनमालकांची प्रत्यक्ष उपस्थिती, पूर्वसूचना, पंचनामा, स्वाक्षऱ्या आणि अधिकृत अभिलेख यांची काटेकोर पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत स्वतंत्र चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी भूमिका शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली.
दरम्यान, नियमबाह्य अथवा चुकीच्या पद्धतीने जमीन खरेदी-विक्री झाल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होत असल्यास आणि खोटी कागदपत्रे किंवा खोटी कामे करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करावी, असा सल्ला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी शेतकऱ्यांना दिल्याचे सांगण्यात आले. यामुळे केल्टे गावातील खोती जमिनींच्या मोजणी, हद्द कायम तसेच संबंधित जमीन व्यवहारांच्या कागदपत्रांची तपासणी होऊन दोषींवर कारवाई होणार का, याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या भेटीवेळी केल्टे गावातील शेतकरी देवेंद्र मेढेकर, चेतन तांबे, विनायक जाधव, राजेंद्र जाधव, कुंदन गायकवाड, बाळकृष्ण मेढेकर, अशोक जाधव, समीर जाधव, जितेंद्र मेढेकर, मंदार जाधव, चंद्रकांत मेढेकर, भरत जाधव, संजीव तांबे आणि अनंत जाधव यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
