| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
पोलीस, महसूल आणि नागरिक यांच्यामधील महत्वाचा दुवा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पोलीस पाटील यांची 1 हजार 121 पदे रिक्त आहेत. महसूल आणि पोलीस प्रशासनासाठी जोडणारा शासनाचा महत्वाचा प्रतिनिधी असलेल्या पोलीस पाटील यांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. त्यामुळे शासनाने ही पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केली आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील महसूली गावे 2 हजार 118 आहेत. ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजारहून अधिक आहे. जिल्ह्यात 868 पोलीस पाटील कार्यरत आहेत. जिल्ह्यातील गावे, वाड्यांमधील कायदा व सुव्यवस्थेची माहिती देण्याचे तसेच महसूल प्रशासनाला मदत करण्याचे काम कार्यरत पोलीस पाटील यांच्या मार्फत केले जाते. गाव वाड्यांमध्ये शांतता आणि कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांची माहिती देणे, आपत्कालीन परिस्थितीत मदत करणे, निवडणुकीत मदत करणे. दरोडा, शांतता भंग किंवा इतर गुन्हेगारी कृत्यांपासून गावाला सुरक्षित ठेवणे, गैरवर्तन किंवा दुर्लक्षाच्या घटनांची माहिती पोहोचवणे, अशा अनेक प्रकारची कामे पोलीस पाटील करतात. ग्रामीण भागात शांतता राखण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यात सध्या 1 हजार 121 पदे रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस पाटीलची पदे भरली नाहीत. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्ह्यात सात उपविभागीय कार्यालये आहेत. यामध्ये अलिबाग, कर्जत, माणगाव, रोहा, महाड या उपविभागीय कार्यालयाच्या अखत्यारित दीडशेहून अधिक पदे रिक्त आहेत. श्रीवर्धन, पनवेल या उपविभागीय कार्यालयाच्या अखत्यारित शंभरहून अधिक आणि पेण कार्यालयच्या अख्यत्यारित येणारी 95 पोलीस पाटील यांची पदे रिक्त आहेत.
पोलीस पाटील हा गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि ग्रामस्थांना पोलीस प्रशासनाशी जोडणारा शासनाचा महत्वाचा प्रतिनिधी आहे. गावाचा कारभार सुरळीत चालविण्यासाठी रिक्त असलेल्या पोलीस पाटील यांची पदे भरणे ही गरज आहे. सुशिक्षित बेरोजागारी ही सध्या एक अत्यंत गंभीर आणि आव्हानात्मक समस्या बनली आहे. पदवी प्राप्त करूनही तरुणांना त्यांच्या पात्रतेनुसार, रोजगाराची संधी मिळत नाही. त्यामुळे तरुण वर्गात प्रचंड निराशा पसरत आहे. जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रायगड जिल्ह्यात रिक्त असलेली पोलीस पाटील यांची पदे तातडीने भरण्यासाठी योग्य कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांनी केली आहे.
Shekap News: पोलीस पाटीलांची पदे तात्काळ भरा: सुरेश घरत
