। पाताळगंगा । वार्ताहर ।
अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीचे रंगकाम अंतिम टप्यात आले आहे. यावेळी शहरासह ग्रामीण भागातही मूर्तिकार रंगकामासाठी दिवस-रात्र मग्न असलेले पहायला मिळत आहे. मूर्तिकार, रंगकाम करणारे कारागीर गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवत आहेत. त्याचबरोबर ठिकठिकाणी गणेशमूर्ती विक्रीला ठेवण्यात आल्या असून बुकिंग ही मोठ्याप्रमाणावर होत आहे.
गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरत असताना मूर्तीचा जीव असणारे डोळे, किरीट, त्रिशूल, गंडक आदीचे रंगकाम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये मूर्ती आकर्षक व रेखीव दिसण्यासाठी डोक्याच्या किरीटाला सोनेरी, सिंहासनाला फिकट गुलाबी, पाठीमागील आसनाला लाल, हिरवा, पिवळा, केशरी आदी रंगानी पुरवठा केला जात आहे. गणेशमूर्ती आकर्षक होण्यासाठी पर्ल कलर व चकमक यांची नवीन डिझाईन आखण्यात येत आहे. यामुळे ग्राहकांचा या डिझाईनच्या गणेशमूर्ती खरेदी करणार्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.