। मुंबई । वृत्तसंस्था ।
सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मंगळवारी संतोष परब हल्लाप्रकरणात जामीनाच्या प्रतिक्षेत असलेले भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, हा अर्जही नितेश राणे यांच्याकडून मागे घेण्यात आला आहे. आता ते कणकवली फौजदारी न्यायालयासमोर आत्मसमर्पण करणार आहेत.
उच्च न्यायालयातही नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळाला जाण्याची दाट शक्यता होती. या पार्श्वभूमीवर आज नितेश राणे यांच्या ओम गणेश बंगल्यावर सकाळपासून वकिलांची खलबत सुरु होती. या बैठकीत नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई आणि कायदेतज्ज्ञ उमेश सांवत हजर होते. तर सतीश मानशिंदे आणि इतर वकील मुंबईतून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीअंती नितेश राणे यांनी न्यायालयासमोर शरणागती पत्कारावी, असा निष्कर्ष निघाला. जेणेकरुन त्यांना जामीन मिळण्याची वाट सुकर होईल, असे वकिलांचे म्हणणे आहे. त्यानुसार नितेश राणे थोड्यावेळात त्यांच्या ओम गणेश बंगल्यावरुन कणकवली न्यायालयात जाणार आहे.
नितेश राणे यांची कणकवली पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची तयारी असून ते तपासात सहकार्य करणार आहेत. त्यामुळे जामीन अर्ज मागे घेऊ द्यावा, अशी विनंती नितेश यांच्यातर्फे ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायमूर्ती चंद्रकांत भडंग यांना केली. न्यायमूर्ती भडंग यांनी ती विनंती मान्य करत अर्ज मागे घेऊ दिला.
सत्र न्यायालयाबाहेर पोलिसांशी हुज्जत घालणे भाजप नेते निलेश राणे यांना महागात पडण्याची शक्यता आहे. कारण आता ओरोस पोलिसांनी निलेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने मंगळवारी नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळाला होता. यानंतर नितेश राणे गाडीत बसून न्यायालयाच्या आवारातून बाहेर पडत असताना पोलिसांनी त्यांची गाडी रोखून धरली होती. त्यावेळी नितेश यांचे ज्येष्ठ बंधू निलेश राणे कमालीचे आक्रमक झाले होते. निलेश राणे पोलीस अधिकाऱ्यांशी वरच्या पट्टीत बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला १० दिवस अटकेपासून संरक्षण दिले असताना पोलीस आमची गाडी अडवूच कशी शकतात, असा जाब निलेश राणे यांनी पोलिसांनी विचारला. बराचवेळ हा वाद सुरु होता. तेव्हा निलेश राणे तावातावाने पोलिसांशी बोलत होते. त्यामुळे पोलिसांनी निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.