रेशनवरील धान्याचा साठा संपल्याने लाभार्थींची उपासमार
। चौल । प्रतिनिधी ।
माथाडी कामगारांच्या संपामुळे मागील पंधरा दिवसांपासून पनवेलच्या एफसीआय या दोन्ही डेपोंमधील अन्नधान्याची उचल बंद आहे. परिणामी, जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानातील धान्याचा साठा संपला आहे. धान्यच शिल्लक नसल्यामुळे नागरिकांना रिकाम्या हाती दुकानातून परत फिरावे लागत आहे. 19 जानेवारीपासून रास्त भाव दुकानात धान्याचा खडखडाट आहे. कोरोनाच्या काळात आधार ठरलेली रास्त भाव दुकाने धान्यावाचून जनतेची उपाशी राहण्याची वेळ आली आहे. परंतु, धान्यावाचून कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोकडे यांनी ङ्गकृषीवलफशी बोलताना दिली.
रायगड जिल्ह्याला रास्त भाव दुकानदारांना अन्नधान्याचा पुरवठा करणार्या पनवेल येथील एफसीआय अन्नधान्य महामंडळ भारत मधील धान्याची उचल करणार्या हमाल आणि माथाडी कामगारांनी मागील पंधरा दिवसांपासून संप सुरु आहे. त्यामुळे धान्याची उचल करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे रेशनदुकानदारांना अद्याप धान्याचा पुरवठा करण्यात आलेला नाही. परिणामी, भाव दुकानातील अन्नधान्याचा साठा जानेवारी महिन्याच्या 19 तारखेपासून संपला आहे. त्यामुळे आज जवळपास पंधरा दिवसांचा काळ उलटून गेला तरी अद्याप धान्याचा साठा रास्त भाव दुकानांमध्ये उपलब्ध झाला नसल्याने लाभार्थींना धान्यावाचून रिकाम्या हाती परत फिरावे लागत आहे. मागील पंधरा दिवसांपासून चार-चार चकरा मारुनसुद्धा धान्य हाती न लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
एफसीआय पनवेलच्या दोन्ही डेपोंमध्ये मागील पंधरा दिवसांपासून हमाल माथाडी कामगारांचा संप सुरु आहे. त्यामुळे डेपोंमधून धान्याची उचल बंद होती. परंतु, मागील दोन दिवसांपासून धान्याची उचल सुरु झाली आहे. त्यामुळे धान्य वितरणामध्ये उशीर होत आहे. जानेवारी महिन्याचे धान्य 15 फेब्रुवारीपर्यंत वितरण करण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानावर धान्य मिळेल, याची दक्षता घेत आहोत, धान्यावाचून कोणीही वंचित राहणार नाही, अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोकडे यांनी ‘कृषीवल’शी बोलताना दिली.
दुकानात धान्याचा साठाच शिल्लक नसल्याने शिधापत्रिकाधारकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. नुकतीच जिल्हा पुरवठा अधिकार्यांशी बैठक झाली असून, त्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. जेव्हा धान्य उपलब्ध होईल, तेव्हा आधी ते धान्यावाचून वंचित राहिलेल्या आधी देण्यात येईल. – महेंद्र पाटील, अध्यक्ष, अलिबाग तालुका रास्त भाव दुकानदार
मी मोलमजुरी करुन कुटुंब चालवतो. रेशनवर धान्यासाठी सकाळी यायचे तर कामावर जायला उशीर होतो.. कधी कधी तर खाडा करावा लागतो. परंतु, इथे आल्यावर धान्य संपल्याचे कळते. परिणामी, रोज बुडतोच, शिवाय त्रासदेखील होतो. लवकरात लवकर संप मिटावा आणि आम्हाला धान्य मिळावे, एवढीच अपेक्षा. – राजेश पाटील, ग्राहक, चौल
‘वराई’ मिळत नसल्याने संप
वराई म्हणजे एक गोण गोडाऊनमधून उचल करण्यासाठी ठेकेदाराकडून हमाल माथाडी कामगारांना देण्यात येणारी रक्कम. ती रक्कम एका गोणीमध्ये मागील ठेकेदाराकडून दोन रुपये अशी ठरविण्यात आली होती. परंतु, ती देण्यात येत नसल्याने तसेच या रकमेत वाढ करावी, यासाठी मागील पंधरा दिवसांपासून माथाडी कामगार संपावर आहेत, अशी माहिती आहे.