लेखी आश्वासनानंतर रास्ता रोकोला स्थगिती
| रायगड जिल्हा | प्रतिनिधी |
खड्डेमय रस्त्यांच्या प्रश्नाबाबत शेतकरी कामगार पक्षाने मंगळवारी (दि.7) एल्गार पुकारला. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेझारी चेक पोस्ट येथे खड्डयांविरोधात सकाळी रस्त्यावर बसून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. अखेर शेकापच्या लाल वादळापुढे बांधकाम विभागाचे प्रशासन नमले असल्याचे चित्र पहावयास मिळाले. शेकापने केलेल्या मागण्यांची दखल घेण्यात आली. मिळालेल्या लेखी आश्वासनानंतर शेकापने आंदोलन स्थगित केले.

यावेळी शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप माजी तालुका चिटणीस अनिल शांताराम पाटील, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सह चिटणीस नरेश म्हात्रे, शेकाप तालुका शेतकरी सभा अध्यक्ष अनिल गोमा पाटील, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, मुरूड तालुका शेकाप तालुका चिटणीस विजय गिदी, विलास म्हात्रे, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, सोनाली मोरे, सुधीर थळे, संजना किर, नागेश कुलकर्णी आदी वेगवेगळ्या आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.

सकाळी आठ वाजल्यापासून पेझारी नाका येथे जमण्यास सुरुवात झाली. बघता बघता नाक्यावर अलोट गर्दी झाली. हातात लाल बावटा घेऊन कार्यकर्त्यांचा जमाव वाढला. महिला, पुरुष, तरुण मंडळी या आंदोलनात स्वयंस्फुर्तीने सहभागी झाले. शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आली.झोपलेल्या सत्ताधाऱ्यांसह भ्रष्टाचारी प्रशासनाला जागे करण्यासाठी हा लढा पुकारण्यात आला.या प्रशासनाचे करायचे काय खाली डोके वरची पाय, धिक्कार असो धिक्कार असो भ्रष्टाचारी प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो अशा तीव्र निषेधाच्या घोषणा करण्यात आल्या. रस्ता रोको आंदोलनाने अलिबाग-पेण मार्गावरील रस्ता चक्का जाम झाला. भर रस्त्यात बसून कार्यकर्ते आंदोलनात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. एक वेगळा उत्साह या आंदोलनाच्या निमित्ताने दिसून आला.
केलेल्या मागण्यांबाबत लेखी आश्वासनानंतरच आंदोलन स्थगित केले जाईल ही भूमिका शेतकरी कामगार पक्षाची होती. शेकाप आपल्या भुमिकेसाठी ठाम राहिला. राष्ट्रीय महामार्गासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह असंख्य जनसमुदायाची भेट घेतली. अधिकाऱ्यांनादेखील खड्डयात बसवून चर्चा करण्यात आली. दिवाळीपुर्वी खड्डे तातडीने दुरूस्त करून रस्ते चांगले बनविले जाणार या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले जाईल असा इशारा देण्यात आला. अखेर लाल वादळासमोर प्रशासनाला झुकावे लागले. रस्त्यांची तातडीने डागडूजी केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यावर रास्ता रोको आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

सर्वसामान्यांकडून शेकापच्या आंदोलनाचे स्वागत
अलिबाग-पेण, अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरूड या मार्र्गावरील खड्डेमय रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला.अपघाताचे सत्र वाढत आहे. प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या खड्डेमय रस्त्यांविरोधात शेतकरी कामगार पक्षाने रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. अनेकांनी शेकापच्या या आंदोलनाचे कौतूक केले. खड्डयांमुळे खुप त्रास होत आहे. शेतकरी कामगार पक्षाने आंदोलनाची घेतलेली भुमिका कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे.

पथनाट्य, भजनातून खड्डेमय रस्त्यांचा पोलखोल
सकाळी साडेनऊ वाजल्यापासून प्रत्यक्षात आंदोलनाला सुरुवात झाली. असंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले. पेझारी येथील चेक पोस्ट परिसर कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, ॲड. मानसी म्हात्रे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते हातात लाल बावटा घेऊन रस्त्यावर बसले. शेकाप तालुका महिला आघाडीच्या वतीने पथनाट्याचे सादरीकरण करण्यात या पथनाट्यातून खड्डयांमुळे होणारा त्रास, अधिकाऱ्यांचा असलेला वेळकाढूपणा, भ्रष्ट सत्ताधारी व अधिकारी यांचा कारभार उघड केला.तसेच नागरिकांना होणाऱ्या त्रासाची जाणीवदेखील या नाट्यातून करून देण्यात आली. तसेच हातात टाळ घेऊन शेकाप स्टाईलने भजन किर्तनाच्या रुपात खड्डेमय रस्त्यांचा पोलखोल करण्यात आला.
असे असणार रस्त्याचे काम
अलिबाग पेण मार्गावरील 22.14 किलो मीटर रस्त्याच्या कामाची प्रशासकीय खर्चासह किंमत 49 कोटी 65 लाख इतकी आहे. निव्वळ स्थापत्य कामाची किंमत निविदेसाठी ) 39 कोटी 40 लाख रुपये आहे. ठेकेदाराने निविदेची भरलेली रक्कम 22.14 कोटी रुपये आहे. देवकर अर्थमुव्हर्स या कंपनीला ठेका देण्यात आला आहे. या कंपनीमार्फत डांबरीकरणाचे काम केले जणार आहे. कामाचा कालावधीत नऊ महिन्याचा आहे. दोन्ही बाजूला मुरमाची साईड पट्टी, संरक्षक भिंत असणार आहे. खड्डे भरण्याचे काम दिवाळीपुर्वी पुण करण्यात येईल. बुधवारपासून खड्डे बुजविण्याचे काम व डागडूजी सुुरू केली जाईल. लवकरच मुळ रस्त्याचे काम सुुरू करण्यात येईल, अशी लेखी माहिती राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी दिले.
पोलिसांचे मानले आभार
खड्डयांविरोधात शेतकरी कामगार पक्षाने मंगळवारी रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाच्यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पाच अधिकारी, 25 कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी, पोयनाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भुजबळ आदी अधिकाऱ्यांचा यावेळी समावेश होता. यावेळी पोलिसांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पोलिसांचे आभार व्यक्त करण्यात आले.
आमदारांकडून कोणतीच अपेक्षा नाही: शेकापच्या चित्रलेखा पाटील यांची टीका
आमदार दळवी यांचा उल्लेख महेंद्र फेल्युअर दळवी असा करत त्यांचा कार्यभार निकृष्ट ठरवला. महेंद्र फेलुअर दळवी नाव दिले तरी चालेल, असा संताप व्यक्त करीत शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून कठोर शब्दांत टीका केली आहे.
दळवी यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही. त्यांना खड्डे अजून खोल करायचेत. चिखलात लोळायला त्यांना भारी आवडते. यांच्या या वक्तव्यातून त्यांनी आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. शेतकरी कामगार पक्षाची नाळ सर्वसामान्यांशी जोडली गेली आहे. सर्वसामान्य जनतेला न्याय देणे शेकापचे काम आहे. मला त्या महिलेची काळजी आहे, बाईकवर नोकरीला जाणाऱ्या मुलाची काळजी आहे. या लोकांच्या अडचणींवर लक्ष केंद्रित करून शेकापने रास्ता रोको आंदोलन केला असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.







