अखेर माजी नगराध्यक्ष आले धावून; डम्पिंगच्या आगीपासून अलिबागची मुक्तता

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग शहरातील कचरा भुमीला गेल्या तीन दिवसांपासून लागलेल्या आगीमुळे धुराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अलिबाग नगरपरिषदेचे प्रशासन यावर ठोस उपाययोजना करण्यास अपयशी ठरले. अलिबागकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करीत अलिबाग नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक मदतीसाठी धावून आले. त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आगीला आटोक्यात आणण्यासाठी लागणारी सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले.

अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा कार्यकाळ मागील वर्षीच संपला. निवडणुका लांबणीवर गेल्याने नगरपरिषदेवर प्रशासक बसविण्यात आले. नगरपरिषदेवर सध्या प्रशासक म्हणून मुख्याधिकारी अंगाई साळुंखे काम करीत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र शहरातील कचराभूमीला आग लागली. या आगीमुळे सोमवारी रात्रीपासून शहर आणि लगतच्या परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत त्याचा त्रास अलिबागकरांना सहन करावा लागला. त्यानंतर बुधवारी पहाटेपासून देखील धुराचे लोट शहरात पसरले होते. अलिबाग नगरपरिषदेने ही आग आटोक्यात प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना फारसे यश आले नाही. धुरामुळे शहरातील लहान मुलांपासून गर्भवती माता, ज्येष्ठ नागरिक, अस्थमाचे रुग्ण व अन्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. धुरामुळे अलिबागकर त्रस्त झाले होते. अलिबागकरांचा श्‍वास कोंडला होता. आग व धुरावर नियंत्रण ठेवण्यास प्रशासन कमी पडत असल्याने माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक बुधवारी सकाळी कचरा भूमीजवळ पाहणी केली. आग विझविण्यासाठी लागणारे पाणी व अन्य साधन सामुग्री स्वखर्चाने उपलब्ध केली. त्यांच्याकडील दोन पोकलॅन एक जेसीबी तसेच पाण्याने भरलेले टँकर व अकरा कामगारांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले. प्रशांत नाईक मदतीसाठी धावून आल्याने नगरपरिषदेसह अलिबागकरांनी सुटकेचा श्‍वास घेतला.

नगरपरिषदेवर गेली वर्षभर प्रशासक आहे. कचराभूमीला लागलेली आग आटोक्यात आणण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना, ती जबाबदारी प्रशासक खंबीरपणे पेलू शकले नाही. काहीजण या आगी व धुराबाबत सोशल मिडीयावर वेगवेगळे मेसेज व्हायरल करीत होते. परंतु एक अलिबागकर म्हणून ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न केले नाही. मात्र अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक मी अलिबागकर माझे अलिबाग ही भूमिका ठेवत सामाजिक बांधिलकीतून शहराच्या व शहरातील नागरिकांच्या हितासाठी धावून आले. प्रत्यक्षात घटना स्थळी जाऊन कचरा भुमीतील आग आटोक्यात आणण्यासाठी लागणारी साधन सामग्री उपलब्ध करून दिली. त्यांच्या या कामगिरीबाबत अलिबागकरांकडून कौतूक होत आहे

अनिल चोपडा , माजी नगरसेवक
Exit mobile version