। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ-कशेळे या भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याचा भाग असलेल्या भागातील रस्त्यावर काँक्रिटीकरणाची कामे सुरु आहेत. त्या कामांसाठी रस्त्याचा एक भाग खोदून ठेवण्यात आला असून त्या भागातून दुहेरी वाहतूक सुरु आहे. रस्ता खोदल्यामुळे रस्त्यावर अगणित खड्डे पडले असल्याने त्या रस्त्याने वाहतूक करताना वाहनचालक यांनी कसरत करावी लागत आहे. दरम्यान रस्ता खोदलेला असताना त्या रस्त्याच्या धोकादायक स्थितीबाबत कोणत्याही प्रकारचे फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावले नसल्याने वाहनचालक यांच्याकडून संताप व्यक्त केला जात आहे.
नेरळ-कशेळे या राज्यमार्ग रस्त्यावर कोल्हारे फाटा ते वाकस पूल या दरम्यान रस्त्यावर काँक्रिटीकरणाची कामे सुरु आहेत. त्या भागातील एका मार्गावर काँक्रीटीकरण केले असून दुसरा मार्ग खोदण्यात आला आहे. साधारण पाचशे मीटर अंतरावरील मार्ग खोदण्यात आल्याने खड्डेमय रस्त्याने प्रवास करताना वाहनचालक यांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरु राहणार असल्याची कल्पना सार्वजनिक बांधकाम विभागाला असताना देखील रस्त्याच्या धोकादायक स्थितीबाबत कोणत्याही प्रकारचे फलक लावले नाही. तसेच, या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून वाहनचालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे.