एपिआय आनंद रावडे यांची सामाजिक बांधिलकी
| कोलाड | प्रतिनिधी |
काही दिवसांपूर्वी महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील अंबेनळी घाटात एक चारचाकी वाहन खोल दरीत कोसळून अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या बचाव पथकाने अत्यंत कठीण परिस्थितीत बचाव कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले. या ऑपरेशनदरम्यान पथकाकडील काही महत्त्वाचे बचाव साहित्य खराब झाले होते. ही बाब एपीआय आनंद रावडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर मंगळवार दि.23 जून रोजी त्यांनी स्वतःहून टीमला संपर्क साधून बोलावून घेतले. तसेच संस्थेचे नुकसान भरून काढण्यासाठी आणि नवीन बचाव साहित्य खरेदी करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या खिशातून आर्थिक सहाय्य केले.
आजच्या काळात अशा प्रकारची संवेदनशीलता, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे अधिकारी प्रशासनामध्ये फार कमी प्रमाणात पाहायला मिळतात. त्यांच्या या मदतीमुळे केवळ साहित्याची भरपाई झाली नाही, तर बचाव कार्यात कार्यरत असलेल्या स्वयंसेवकांचा उत्साह आणि मनोबल देखील वाढणार आहे. याबद्दल सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या वतीने आनंद रावडे आभार मानले. त्यांच्या या सामाजिक जाणीवेचा आणि मदतीचा आदर्श इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.







