प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
| म्हसळा | प्रतिनिधी |
म्हसळा नगरपंचायतीच्या डंपिंग ग्राउंडला पुन्हा एकदा भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरवर्षी उन्हाळ्यातच अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने ही आग नैसर्गिकरित्या लागते की मुद्दाम लावली जाते, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
दुर्गवाडी आणि गवळवाडी गावांच्या हद्दीत असलेल्या या डंपिंग ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे कचऱ्यातून निघणाऱ्या उष्णतेने आगीने रौद्ररूप धारण केले. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मात्र डंपिंग ग्राउंड डोंगर उतारावर असल्याने आग नियंत्रणात आणणे कठीण झाले. मागील दहा वर्षांपासून खाजगी जागेत सुरू असलेल्या या डंपिंग ग्राउंडवर दरवर्षी हजारो टन घनकचरा टाकला जातो. ओला व सुका कचरा वेगळा केला जात नाही, तसेच कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न झाल्याने येथे अक्षरशः कचऱ्याचा डोंगर उभा राहिला आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून म्हसळा शहरासह दुर्गवाडी गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.







