नेरळ घनकचरा प्रकल्पाच्या कचऱ्याला आग

परिसरात धुरांचे प्रचंड लोट, नागरिकांना श्वास घेण्यास त्रास

| नेरळ | वार्ताहर |

नेरळ शहराच्या कचरा व्यवस्थापनासाठी असलेला घनकचरा प्रकल्पासमोर रविवारी (दि.31) मार्च रोजी आग लागली. या आगीच्या धुरांचे प्रचंड लोळ उठल्याने परिसरातील नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यामुळे कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांनी जिल्हा परिषदसह प्रशासनाला याबाबत सूचित करून पुढील मोठी हानी रोखली. घनकचरा प्रकल्पासमोरच आग लागल्याने या प्रकाराबाबत विरले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तालुक्यातील नेरळ शहरात कचऱ्याच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्पच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या प्रकल्पाच्या समोरच कचऱ्याचे मोठे ढीग साठले असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असतो. हेही कमी म्हणून रविवार (दि.31) मार्च रोजी या कचऱ्याच्या ढिगाला आग लागली. दुपारी साधारण साडेबारा लागलेली हि आग चांगलीच भडकली. त्यामुळे उमा नगर, साई मंदिर, स्टेशन परिसर, पेशवाई मार्ग पासून ते थेट धामोते भागात दूरचे लोट पोहचले असल्याने नागरिकांना श्वास घेणे देखील जिकरीचे झाले. त्यामुळे या भागातील नागरिकांनी कोल्हारे ग्रामपंचायत सरपंच महेश विरले यांना फोन करून यावर उपाययोजना करण्याची विनंती केली. तेव्हा महेश विरले यांनी तात्काळ या आग लागलेल्या भागाला भेट देऊन अग्निशमन दल, नेरळ ग्रामपंचायत यांना याबाबत माहिती देऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी त्यांचे सहकारी रोशन म्हसकर, पपेश विरले थांबून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तर याबाबत समजताच नेरळ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक अरुण कारले, कर्मचारी मंगेश ईरमाले, कृष्णा पारधी यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच याठिकाणी दोन गायी बांधून ठेवण्यात आल्या होत्या. त्यांच्या बाजूला आगीची झळ पोहचू नये म्हणून संदेश साळुंके यांनी त्या गायींना दुसऱ्या ठिकाणी नेऊन बांधले.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी या प्रकल्पाला भेट देऊन वाहवा केली होती. मात्र प्रत्यक्षात याठिकाणी रायगड जिल्हा परिषदेने सुमारे पाऊणे दोन कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प ठेकेदाराला आंदण दिला आहे. तेव्हा आता आगीने पितळ उघड पडलेल्या या प्रकल्पाच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची हिम्मत जिल्हा परिषद व नेरळ ग्रामपंचायत दाखवेल का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

घनकचरा प्रकल्पासमोर कचऱ्याचा ढीग असून त्याला रविवारी आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, आग धुमसत असल्याने धुराचे प्रचंड लोळ होते. यामुळे नागरिकांना त्रास झाला असल्याने घनकचरा प्रकल्पाच्या ठेकेदाराला नोटीस देण्याची कारवाई करत आहोत.

अरुण कारले,
ग्रामसेवक नेरळ ग्रामपंचायत

आम्ही तात्काळ त्या ठिकाणी पोहचून प्रशासनाला फोन करून याबाबत माहिती कळवली. पाण्याचे टँकर बोलावून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत याबाबत आम्ही कायमचा मार्ग काढण्यासाठी चर्चा करणार आहोत.

महेश विरले,
सरपंच कोल्हारे ग्रामपंचायत
Exit mobile version