| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग शहरातील नगरपरिषदेसमोरील राधेश्याम सोसायटीला गुरुवारी (दि.27) सायंकाळी अचानक आग लागली. या आगीत तळमजल्यावर असलेले सर्व मिटर जळून खाक झाले. शॉर्ट सर्कीटमुळे ही आग लागली असून सुदैवाने जीवितहानी टळली. नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली.
अलिबाग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी नगरपरिषदेसमोर राधेश्याम नावाची सोसायटी आहे. हा परिसर संध्याकाळच्या वेळेला कायमच गजबजलेला असतो. गुरुवारी सायंकाळी या सोसायटीमधून अचानक धूर येऊ लागला. ही बाब अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या लक्षात आल्यावर सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण केले. त्याचवेळेला शेकाप कार्यकर्त्यांनीदेखील घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तात्काळ मदत पोहचल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही आग इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या वीज मीटरमध्ये लागली होती. शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.







