इमारतीतील मीटर बॉक्सला आग

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शहरातील गावदेवी मंदिराच्या पाठीमागील बाजूस, उत्कर्ष दवाखान्याशेजारी असलेल्या श्री सदन इमारतीतील मीटर बॉक्सला अचानक आग लागल्याची घटना घडली. यावेळी मीटर बॉक्समधून धूर व आगीच्या ज्वाळा निघू लागल्याने इमारतीतील रहिवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीची माहिती मिळताच पनवेल अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी तत्परतेने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत मीटर बॉक्स आणि विद्युत वायरिंगचे काही प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, नुकसान झालेल्या वायरिंगची तपासणी व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, विद्युत बिघाडामुळे आग लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version