शिकार्‍यांकडून वनविभाग पथकावर गोळीबार

। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।

चौकुळ इसापूर या जंगलमय भागामध्ये शिकारीसाठी फिरत असलेल्या चार जणांना वनविभागाच्या गस्तीपथकाने ताब्यात घेतले आहे. यावेळी संबंधित शिकार्‍यांकडून वनविभागाच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आंबोली जंगलात काही शिकारी फिरत असल्याची माहिती शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी मंगळवारी मध्यरात्री ईसापुर परिसरात हे चौघे संशयास्पदरित्या दिसून आले. त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी हातात असलेले बंदूक घेऊन गोळीबार करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, त्यांच्याकडील वाहनाची तपासणी केली असता एक शिकार केलेला मृत ससा, पाच जिवंत काढतुसे, दोन बॅटर्‍या, दोन मोबाइल एक हेडफोन आणि तीन दुचाकी आधी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

दशरथ बाबुराव राऊळ (रा. माडखोल), प्रशांत सदानंद कुबल (रा. कुडाळ), अमोल नामदेव गावडे (रा. खासकीलवाडा चौकुळ), सखाराम चंद्रकांत राऊळ (रा. माडखोल) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे शिंदे यांनी सांगितले.

Exit mobile version