भयानक! खासगी बससह ट्रकवर गोळीबार

| अमरावती | वृत्तसंस्था |

अमरावती नागपूर महामार्गावर अज्ञातांनी एका खासगी बस आणि ट्रकवर गोळीबार केला. यामुळे महामार्गावरील वाहन चालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर तिवसाजवळ रात्री उशिरा 12 च्या सुमारास ही घटना घडली आहे. नागपूर येथील काही भाविक शेगावला गजानन महाराजांच्या दर्शनासाठी 17 सीटर खासगी बसने गेले होते. शेगावला गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यावर रविवारी (दि.10) सायंकाळी हे भाविक अमरावतीला श्री अंबादेवी मातेच्या दर्शनासाठी आले होते. अंबादेवीचे दर्शन घेतल्यावर भाविकांची खासगी बस नागपूरच्या दिशेने निघाली असताना नांदगाव पेठ ते तिवसा पोलीस ठाण्यादरम्यान अज्ञात आरोपींनी या बसवर चालकांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात बसच्या खिडकीच्या काचा फुटल्यामुळे प्रवासी जखमी झाले असून चालकदेखील जखमी झाला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांसह तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील सर्व चारही जखमींना तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

खासगी बसवर गोळीबार करुन बस थांबली नसल्यामुळे या आरोपींनी याच मार्गावरुन जाणाऱ्या एका ट्रकवर गोळीबार केला. यानंतर ट्रक थांबताच चालकाला पकडून मारहाण केली आणि ट्रकमधील माल लुटून आरोपींनी पळ काढला. गोळीबार करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांचा तिवसा पोलीस शोध घेत आहेत.

Exit mobile version