। अमरावती । प्रतिनिधी ।
अमरावती येथे बस नदी पात्रात कोसळून मोठा अपघात झाला. बसमधील 50 प्रवाशांपैकी सहा जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत.
अमरावती येथे खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. मेळघाटात सीमा डोहलगत अमरावतीवरून धारणीकडे जाणारी चावला ट्रॅव्हल्स ही खाजगी बस पुलावरून नदीत कोसळली. हा अपघात सोमवारी (दि. 23) सकाळच्या सुमारास घडला. ही बस अमरावती येथून धारणीकडे जात असून या बसमध्ये 50 प्रवासी होते. सेमाडोह येथील भूतखोरा परिसरात धोक्याच्या वळणावर असणाऱ्या नदीच्या पुलावर बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस पुलाखाली थेट नदीत कोसळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले आहेत. त्यातील सात जण गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात नेताना दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित जखमींवर अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.