। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या वतीने सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना प्रतीक्षा असणाऱ्या ‘टॅलेंट हंटची’ पहिली फेरी संपन्न झाली. यामध्ये इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी अशा दोन गटात २२००० विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांमधील गुणवत्ता शोधण्यासाठी ‘टॅलेंट हंटची’ प्रतीक्षा विद्यार्थ्यांसहित शिक्षक आणि पालकांनाही होती.
लायन्स क्लब ऑफ अलिबाग, डायमंड क्लब आणि लिओ क्लब एकत्र येऊन, सर्व लायन मेंबर्स सकाळी ७:३० वाजल्यापासून कामाला लागले. एका दिवसात बावीस हजार मुलांच्या परीक्षा घेतल्या आणि ‘टॅलेंट हंट’ चा पहिला राऊंड यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तोंडओळख करुन देणे, स्पर्धेला सामोरे जाण्याची तयारी करुन घेणे, मुलाखतीला सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास वाढविणे तसेच विद्यार्थ्यांमधील छुप्या गुणवत्तेचा शोध घेऊन व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. पहिल्या फेरीतील दोन्ही गटातून निवडक पाचशे विद्यार्थ्यांची दुसरी चाचणी , त्यानंतर त्यातून पन्नास विद्यार्थी आणि अखेर केवळ पाच गुणवंत निवडण्यात येतील. एवढ्यावरच न थांबता सदर विद्यार्थ्यांना यथोचित समुपदेशन आणि मार्गदर्शन करणार असल्याचेही यावेळी आयोजकांनी सांगितले. लायन्स क्लब अलिबागच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल तालुक्यातील पालकांसह सर्व शिक्षकांनी समाधान व्यक्त केले.

सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी लायन अध्यक्ष अविनाश राऊळ, सचिव रोहन पाटील, खजिनदार चंद्रहार शिंदे, लायन सर्वश्री प्रवीण सरनाईक, नयन कवळे, महेश मोघे,रणजित जैन, महेंद्र पाटील, संतोष पाटील, अतुल वर्तक,दीपक पाटील ,जान्हवी आगाशे, शिल्पा कवळे, परेश भतेजा, प्रकाश गुरव, दीनानाथ पाटील, दिलिप गुरव, विलास नाईक आणि नागाव लायन्स क्लब, अलिबाग डायमंड, अलिबाग लिओ, अलिबाग लायन क्लबच्या सर्व लायन सभासद , एन एस एसचे स्वयंसेवक आणि शिक्षक यांनी प्रचंड मेहनत घेतली.