| दापोली | प्रतिनिधी |
दिवाळी संपल्यानंतर कोकणातील पर्यटनाला पुन्हा वेग आला असून, पर्यटकांची पावले प्रसिद्ध दापोली तालुक्यातील हर्णे बंदराकडे वळू लागली आहेत. समुद्रकिनाऱ्यांची भटकंती, निसर्गरम्य वातावरण आणि ताज्या मासळीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक हर्णे बंदराला पसंती देत आहेत. पर्यटकांच्या वाढत्या ओघामुळे हर्णेतील मासळी बाजारपेठेतही तेजीचे चित्र पाहायला मिळत आहे.
हर्णे बंदरातील बाजारपेठेत सध्या पापलेटचे दर 800 ते 900 रुपये, तर सुरमईचे दरही 700 ते 900 रुपये किलोच्या दरम्यान आहेत. जाडी कोळंबी 300 रुपये, टायनी कोळंबी 100 रुपये, बांगडा 150 ते 200 रुपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे मासळी खरेदी करताना ग्राहकांना खिशाचा विचार करावा लागत असला, तरी ताज्या मासळीला चांगली मागणी असल्याचे चित्र आहे.
दिवाळीनंतर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने हर्णे परिसरातील हॉटेल, खानावळी आणि स्थानिक मासळी विक्रेत्यांच्या व्यवसायालाही चालना मिळत आहे. अनेक पर्यटक थेट हर्णे बंदरात जाऊन ताजी मासळी खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. समुद्रातील मासळीची आवक आणि बाजारपेठेतील मागणी यानुसार दरांमध्ये चढ-उतार होत आहेत. सध्या मासळीचे दर चढे असले तरी पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आगामी काळात पर्यटनाची लगबग कायम राहिल्यास मासळी बाजारपेठेतील उलाढालीलाही आणखी वेग येण्याची शक्यता आहे.
मासळीचे दर (प्रतिकिलो)
पापलेट 800 ते 900सुरमई 700 ते 900 जाडी कोळंबी 300 टायनी कोळंबी 100बांगडा 150 ते 200.
