फिल्मी स्टाईलने आरोपीचा पाठलाग
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मच्छीमारांना एक कोटी रुपयांचा गंडा घालून पसार झालेला व्यापारी अलिबाग पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार हणमंत सुर्यवंशी आणि अतुल जाधव यांनी फिल्मी स्टाईलने त्याच्या कारचा पाठलाग करून त्याला अटक केले आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नायब मजिद सोलकर (रत्नागिरी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने 9 सप्टेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत मच्छीमारांकडून मासळी घेतली होती. परंतु, त्यांची रक्कम दिली नाही. त्यामुळे त्याने 1 कोटी 52 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु, तपासात वेग दिसून आला नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनानुसार अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी या तपासाची सुत्रे पोलीस हवालदार हणमंत सुर्यवंशी यांच्याकडे देण्यात आली. सायबर सेलच्या मदतीने सुर्यवंशी यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपी बुधवारी (दि.5) मुंबई येथून रत्नागिरीला जाणार असल्याची माहिती सुर्यवंशी यांना मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सापळा रचण्यात आला. पोलीस आपल्या शोधात असल्याची माहिती आरोपीला मिळताच त्याने त्याच्या कारमधून पसार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस हवालदार सुर्यवंशी व अतुल जाधव यांनी फिल्मी स्टाईलने त्याच्या कारचा पाठलाग केला. अखेर त्याला मोठ्या शिताबीने ताब्यात घेण्यात आले.
आरोपी नायब सोलकर याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.