। उरण । वार्ताहर ।
उरणमधील बहुतांश सोसायटीसह अनेक भागांमध्ये पाणीटंचाईने नागरिक हैराण असतानाच पुनर्विकास प्रकल्पांसाठी मात्र बिल्डरांना मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा केला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नियमित कर भरणार्या रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. येथील जुन्या इमारतींना दिवसातून काही तासच पाणीपुरवठा केला जात असून काही ठिकाणी गेले अनेक दिवस पाणीच नाही. मात्र, बिल्डरांच्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे. याबाबत सोसायटीमधील रहिवाशांनी अनेकवेळा पालिकेकडे लेखी आणि तोंडी तक्रारी केल्या आहेत. परंतु, यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही. पालिकेच्या अधिकार्यांकडून सांगण्यात येत आहे की, पाणीटंचाई हा तांत्रिक प्रश्न आहे आणि तो लवकरच सोडवला जाईल. मात्र, नागरिकांचा आरोप आहे की हे कारण देऊन जुनी घरे दुर्लक्षित केली जात आहेत, तर पुनर्विकास इमारतींना मोठ्या प्रमाणात पाणी दिले जात आहे.