। कोलाड । वार्ताहर ।
शनिवार-रविवार अशी दोन दिवस सुट्टी असल्यामुळे तसेच, लग्नाचा हंगाम असल्यामुळे हजारो चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. यामुळे कोलाडमधील अपुर्या रस्त्यामुळे एक-दोन तास प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. दरम्यान, कोलाड येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गवर शनिवारी (दि.8) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावेळी कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस, वाहतूक पोलीस तसेच, ट्राफिक वार्डन यांच्याकडून वाहतूक कोंडी नियंत्रणात आणली गेली. कोलाड येथील बाजारपेठेत 18 वर्षानंतर ही अजून एकेरी रस्ता असल्यामुळे येथे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच, प्रवाशी वर्गाचा खोलंबा होत आहे.