अटल सेतूप्रमाणे मोबदल्याची मागणी; विजय गिदींचा निवेदनाद्वारे इशारा
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
प्रस्तावित टोकेखार-तुरूंबाडी पुलामुळे राजपुरी खाडीवर अवलंबून असलेल्या हजारो मच्छिमारांच्या उदरनिर्वाहावर गंडांतर येण्याची भीती निर्माण झाली आहे. मच्छिमारांना विश्वासात न घेता प्रकल्पाचे भूमीपूजन केल्याने संतापलेल्या मच्छिमारांनी आता आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. अटल सेतूप्रमाण्ो प्रत्येक कुटुंबाला मोबदला द्यावा, अशी मागणी श्री महालक्ष्मी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन विजय गिदी यांनी केली आहे. येत्या 15 दिवसांत योग्य कार्यवाही न झाल्यास सागरी आंदोलन छेडण्याचा, तसेच पुलासाठी एकही दगड लावू न देण्याचा इशारा त्यांनी हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला निवेदनाद्वारे दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुरूड तालुक्यातील राजपुरी येथे श्री महालक्ष्मी मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी असून, या संस्थेचे 1 हजार 151 सभासद आहेत. संस्थेच्या 115 यंत्रचलित नौकांच्या माध्यमातून स्थानिक मच्छिमार अनेक पिढ्यांपासून राजपुरी खाडीत मासेमारी करून उदरनिर्वाह करीत आहेत. 2004 मध्ये राजपुरी खाडीतील दिघी बंदरात दिघी पोर्टची निर्मिती झाल्याने मासेमारीचे क्षेत्र कमी झाले. त्याचा विपरीत परिणाम मासेमारी व्यवसायावर झाला असून, आधीच संकटात सापडलेल्या मच्छिमारांसमोर आता नव्या पुलाचे संकट उभे राहिले आहे.
मुरूड तालुक्यातील टोकेखार आणि म्हसळा तालुक्यातील तुरूंबाडीदरम्यान प्रवासी पूल उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. 13 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री यांच्या हस्ते या कामाचे भूमीपूजनही करण्यात आले. मात्र, स्थानिक मच्छिमारांना विश्वासात न घेताच भूमीपूजन सोहळा पार पडल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रस्तावित पुलामुळे राजपुरी खाडीतील 13 कोळीवाड्यांमधील मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार आहे. हजारो कुटुंबांचे पारंपरिक मासेमारी व्यवसायाचे साधनच नष्ट होण्याची भीती विजय गिदी यांनी व्यक्त केली आहे.
सरकारने मच्छिमारांच्या उपजीविकेचा विचार करून राजपुरी खाडीवरील 13 कोळीवाड्यांची पाहणी करावी आणि अटल सेतूप्रमाण्ो प्रत्येक कुटुंबातील सदस्याला मोबदला द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अन्यथा पुलाच्या कामासाठी एकही दगड लावू देणार नाही. 15 दिवसांत मागण्यांवर निर्णय न झाल्यास मच्छिमार सागरी आंदोलन छेडतील, असा स्पष्ट इशारा विजय गिदी यांनी दिला आहे.
