आ. रमेश पाटील यांची मागणी
। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
समुद्र किनारी राहणारा मच्छिमार हा मागील तीन वर्षांपासून विविध संकटाना तोंड देत आहे. बदलते हवामान यामुळे मासेमारीवर परिणाम होत आहे. मागच्या अडीच वर्षांपूर्वी असणार्या सरकारने कोळी समाजाच्या समस्येकडे फारसे लक्ष न दिल्यामुळे स्थानिक मच्छिमारांना न्याय मिळू शकलेला नाही. वारंवार होणार्या नैसर्गिक संकटामुळे मच्छिमार दुःखाच्या खाईत लोटला गेला आहे. त्यांना मदत म्हणून निदान खावटी योजनेचा फायदा राज्यशासनाने मिळून द्यावा, अशी आग्रही मागणी कोळी महासंघाचे नेते व आमदार रमेशदादा पाटील यांनी केली आहे.
बदलते हवामान व मच्छिमारांवर झालेला परिणाम याबाबत आपले विचार व्यक्त करताना ते आमच्या प्रतिनिधींशी बोलताना आपले विचार व्यक्त केले आहेत.
यावेळी आमदार पाटील यांनी सांगितले की, मच्छिमारांच्या गेल्या अनेक वर्षांपासून डिझेल परतावा रक्कम बाकी आहे. किमान ती तरी लवकरात लवकर देऊन स्थानिक मच्छिमारांना दिलासा द्यावा, डिझेल परतावा वेळेत न दिल्यामुळे कोकणातील मच्छिमार संस्थांची अवस्था बिकट झाली आहे. कोरोना कालावधी तद्नंतर आलेली अनेक वादळे त्यामुळे स्थानिक मच्छिमार मेटाकुटीस आलेला असून, त्याला जगवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन मदतीचा हात पुढे केला पाहिजे, तरच कोकण किनारपट्टीवरील मासेमारी टिकून राहील, असा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला आहे.