मुरूडमधील मच्छिमारांची हंगामी कसरत

15 ऑगस्टपासून मच्छीमारीला सुरुवात
अद्यावत जेट्टी नसल्याने कोळी बांधवांची दमछाक

| आगरदांडा | गणेश चोडणेकर |

मासेमारी हा कोळी समाजाच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे. मासेमारी हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मच्छीमार बांधवांमध्ये लगबग वाढली आहे. यंदा आगामी 15 ऑगस्टपासून मच्छीमारी हंगामाला सुरुवात होणार असल्याने बोटींची दुरुस्ती, जाळ्यांची डागडुजी, इंजिनची तपासणी, बोटीची रंगरंगोटी तसेच आवश्यक साहित्याची खरेदी करण्याची कामे जोरात सुरू आहेत. मात्र, मुरूडमध्ये अद्यावत अशी जेट्टी नसल्यामुळे प्रत्येक हंगामात बोटीत साहित्य भरताना मच्छीमारांना शारीरिक कष्ट सहन करावे लागत असून, त्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. दरम्यान, मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी या भागात अद्यावत अशी जेट्टी उभारण्याची आवश्यकता असल्याचे कोळी बांधवांमधून बोलले जात आहे.

मासेमारी हंगामाची चाहूल लागताच मुरूडमधील कोळीवाड्यांमध्ये मच्छीमार बांधवांची लगबग सुरू झाली आहे. पावसाळ्यातील बंदीनंतर तब्बल तीन महिन्यांनंतर पुन्हा एकदा समुद्रात मासेमारीसाठी जाण्याची तयारी मच्छीमारांकडून करण्यात येत आहे. यादरम्यान, अनेक ठिकाणी बोटी किनाऱ्यावर आणून त्यांची रंगरंगोटी व दुरुस्ती केली जात आहे. तसेच, खराब झालेली मासेमारीची जाळी बदलणे आणि नवीन जाळी तयार करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. तसेच, समुद्रात जाण्यापूर्वी बोटीमध्ये जाळी, डिझेल, बर्फ, खाद्यसामग्री, पाणी तसेच मासेमारीसाठी आवश्यक साहित्य भरण्याची कामे वेगाने सुरू आहेत. नवीन हंगामात चांगली मासळी मिळून उत्पन्न वाढेल, अशी अपेक्षा मच्छीमार व्यक्त करत आहेत.

मासेमारी सुरू झाल्यानंतर बाजारपेठेत ताज्या मासळीची आवक वाढण्याची शक्यता असून, ग्राहकांनाही विविध प्रकारच्या मासळीचा पुरवठा होणार आहे. हंगामाच्या पार्श्वभूमीवर मच्छीमार कुटुंबांमध्येही उत्साहाचे वातावरण असून, गेल्या काही दिवसांपासून तयारीला वेग आला आहे. मात्र, असे असताना मुरूड तालुक्यात अद्यावत अशी जेट्टी नसल्यामुळे येथील मच्छीमारांना किनाऱ्यावर बोटी उभ्या करण्यासाठी तसेच बोटीत साहित्य चढविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मुरूडमधील मच्छीमारांना जड सामान डोक्यावर किंवा खांद्यावर घेऊन किनाऱ्यापासून बोटीपर्यंत जाण्याची वेळ येत आहे. त्यातच खडक आणि उथळ पाण्यातून वाट काढताना सामान बोटीपर्यंत पोहोचवणे अधिकच त्रासदायक ठरत आहे. तसेच, भरतीच्या वेळी कोळी बांधवांना एकदरा खाडीत बोटी टाकून त्या पुलाजवळ उभ्या करून कापडाच्या आधारे त्यात बर्फासह इतर सामान बोटीत उतरावे लागत आहे. यादरम्यान, बोटीत साहित्य भरताना मच्छीमारांना शारीरिक कष्ट सहन करावे लागत असून, त्यांची अक्षरशः दमछाक होत आहे. त्यामुळे मच्छीमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी या भागात अद्यावत अशी जेट्टी उभारण्याची आवश्यकता असल्याचे कोळी बांधवांमधून बोलले जात आहे.

मुरुड समुद्रकिनारी अद्यावत जेट्टी नसल्याने मच्छीमार कोळी बांधवांना अनेक वर्षांपासून मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आताच्या सरकारने ग्रोयन्स बंदर मंजूर केले असून, त्याचे नुकतेच भुमीपुजन झाले आहे. त्यामुळे या बंदराचे काम लवकरात लवकर सुरू करुन मच्छीमार कोळी बांधवांना दिलासा द्यावा.

– मनोहर बैले, संचालक, राज्य मच्छीमार संघ

Exit mobile version