| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील चिर्ले गावठाण गावात एकाच दिवशी पाच घरात चोर्या झाल्या. बंद दरवाज्याच्या कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्याचे दागिने, रोख रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना शनिवारी (दि.10) घडली आहे. या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरी एक महिन्याचा कालावधी लोटला असतानाही अज्ञात चोरटे पोलीसांच्या हाती न लागल्याने रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील रहिवाशी असलेल्या प्रथमेश नामदेव मढवी यांची आई सुनंदा नामदेव मढवी ही उडिसा येथे देवदर्शनाला गेली होती. तसेच गुरुवार दि 10 नोव्हेंबर रोजी प्रथमेश नामदेव मढवी हा तरुण रात्र पाळीसाठी दिघोडे येथील कंटेनर यार्ड मध्ये कामावर गेला होता. त्याच्या जाण्याचा व रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत बंद घराच्या दरवाजाची कडी कोयंडा कोणी तरी तोडल्याचे शेजारच्या मंडळींच्या निदर्शनास आले. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून प्रथमेश मढवी याना शेजारच्या मंडळीने माहिती दिली. प्रथमेश मढवी यांनी आपल्या घराकडे धाव घेऊन झालेल्या प्रकरणाची पाहणी करून घडलेल्या प्रकरणाची माहिती उरण पोलिसांना दिली.
उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराची पाहणी केली. तर घरातील सामान विखुरलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले तसेच लाकडी कपाट तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. यावेळी कपाटातून रोख रक्कम 20 हजार रुपये तसेच मण्यांची माळ, अर्धा तोळे ( किंमत 20 हजार रुपये), गोल्ड काँईन 1 ग्रँम (किंमत 5 हजार रुपये), कानातील रींग 4 ग्रँम(किंमत 15 हजार रुपये)असे एकूण 60 हजारांचे ऐवज लंपास केले असल्याचे प्रथमेश नामदेव मढवी यांनी पोलीसांना सांगितले. त्याच दरम्यान प्रथमेश मढवी यांच्या घराजवळील शेजारी असलेल्या उमेश परशुराम मढवी, संतोष चंद्रकांत पाटील, रामनाथ रामा मढवी, यशवंत दामाजी पाटील यांच्या ही बंद घराच्या दरवाजाची कडी कोयडा रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत अज्ञात चोरट्यांनी तोडल्याचे शेजारच्या मंडळींकडून सांगण्यात आले.
पोलीस यंत्रणेने सदर घटनेचे गांभीर्य ओळखून सदर घरांची पाहणी केली. तर संतोष चंद्रकांत पाटील हे पनवेल येथे वास्तव करत असल्याने व त्यांची आई ही मुलीच्या डिलेवरीसाठी मुंबई येथे गेली असल्याने त्यांच्या राहत्या घरातील लोखंडी कपाट तोंडून फुलांच्या डिझाइनच्या अर्धा-अर्धा तोळ्याच्या दोन वस्तू (किंमत 40 हजार रुपये), अंगठी अर्धा तोळे (किंमत 20 हजार रुपये), कानसाखळी 3 ग्रँम (किंमत 15 हजार रुपये) तसेच रोख रक्कम 70 हजार रुपये असा एकूण 1 लाख 45 हजार रुपया ऐवज घेऊन पोबारा केल्याचे तपासातून समोर आले. यासंदर्भात उरण पोलीस ठाण्यात गुरुवार दि. 10 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तक्रार संदर्भात सहा.पोलीस निरिक्षक व्हि.आर.राजवाडे हे उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत. परंतु एक महिन्याचा कालावधी लोटला असतानाही अज्ञात चोरटे पोलीसांच्या हाती न लागल्याने रहिवाशांमध्ये सध्या भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे.