। पालघर । प्रतिनिधी ।
जव्हार तालुक्यात पाच वर्षांच्या चिमुरडीवर परप्रांतीय मजुराने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
जव्हार तालुक्यातील ओझर या गावी बीएसएनएल टॉवरच्या उभारण्याचे काम चालू होते. टॉवर लावण्यासाठी आलेल्या परप्रांतीय मजुरांना पावसाळ्यात घराच्या ओसरीत राहण्यासाठी जागा दिली होती. पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत शेतातील घरात राहत होती. बुधवारी (दि. 28) मुलीचे पालक शेतीच्या कामात व्यस्त असल्याचा गैरफायदा घेत एका मजुराने या पाच वर्षीय चिमुकलीचे लैंगिक शोषण केले. संध्याकाळी मुलीची आई घरी आल्यावर तिने अतिप्रसंगाची सगळी हकीकत आपल्या आईला सांगितली.
त्यानंतर मजुरांची चौकशी केली असता ते सर्व गावातून फरार झाल्याचे समझले. याबाबत जव्हार पोलीस ठाण्यात तक्रार केली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.