भारताचा झेंडा टेक चंदकडे

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
टोक्यो पॅरालिंपिक्स स्पर्धेला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्घाटन सोहळ्यात नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. उद्घाटन सोहळ्यात 75 जणांनी कला सादर केली. दुसरीकडे मैदानही रिकामी होतं. गगनभेदी आतषबाजी केल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वात आधी जापानचा झेंडा मैदानात आणला गेला आणि राष्ट्गीत गायलं गेेले. त्यानंतर एक एक करत इतर देशाचा चमू मैदानात उतरला. भारताकडून शॉटपुटचा पॅरा अ‍ॅथलीट टेक चंद तिंरगा घेऊन मैदानात उतरला.त्याच्यासोबत भारताचे आठ सदस्य होते. यापूर्वी ध्वजवाहकाची जबाबदारी मरियप्पन थंगावेलु यांच्याकडे होती. मात्र शेवटच्या क्षणी ही धुरा टेक चंदकडे देण्यात आली. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या पॅरालिम्पिक चमूने उद्घाटन सोहळ्यात सहभाग नोंदवला नाही. टोक्योत वाढत्या कोरोना रुग्णामुळे न्यूझीलंडने हा निर्णय घेतला.

पॅरालिम्पिक खेळाची सुरुवात 1960 मध्ये करण्यात आली. भारताने तेल अवीव पॅरालिम्पिक 1968 मध्ये पहिल्यांदा भाग घेतला होता. त्यानंतर 1984 पासून भारत या स्पर्धेत सलग भाग घेत आहे. आतापर्यंत भारताने 11 पॅरालिम्पिक खेळात भाग घेतला आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चार सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्य पदक पटकावले आहेत. यातील दहा पदके भारताने अ‍ॅथलेटिक्स प्रकारात मिळवली आहेत.

Exit mobile version