Uran Rain Updates: उरण जलमय, प्रशासन झोपेत?

बेकायदेशीर भरावामुळे पूरस्थिती; उरणकरांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत

| उरण | प्रतिनिधी |

उरण शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. येथील अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. चिरनेर गावात पुरपरिस्थिती निर्माण झाली असून, नागावसह इतर गावातील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. दरवर्षी हीच परिस्थिती असताना कोट्यवधी रुपयांचा विकास नेमका कुठे झाला, असा संतप्त सवाल आता उरणकर विचारू लागले आहेत. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी नसल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे.

उरण तालुक्यात शनिवारी (दि.4) सकाळपासून जोर धरल्यामुळे चिरनेर गावाला पुन्हा एकदा पुराच्या पाण्याचा जोरदार फटका बसला आहे. येथील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी घुसून संसार उपयोगी सामानाबरोबर चीज वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, पाणी निचरा होण्याचे नैसर्गिक मार्ग बंद झाल्यामुळे येथील शेतजमीनी देखील पाण्याखाली आल्या असून, शेतकऱ्यांनी आताच टाकलेले भाताचे बियाणे पाण्यात बुडून गेले आहे. त्याचबरोबर चिरनेरसह नागाव, कळंबुसरे, मोठीजुई, विंधणे, दिघोडे, वेश्वी पाले इत्यादी गावांनाही पुराचा फटका बसला आहे. तर कातळपाडा, मधीलपाडा, रांजणपाडा चिंचपाडा, मुळपाडा, कुंभारपाडा येथे रहिवाशांच्या घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. कातळपाडा हद्दीत येणारी माथेरान ही नवीन वसाहत देखील जलमय होऊन, येथील रहिवाशांच्या घरात पाणी शिरून घरांची तळी झाली आहेत. त्याचबरोबर उरण रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांना चक्क पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागत आहे. शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर देखील गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीचा पूर्ण बोजवारा उडाला आहे. दरम्यान, सत्र न्यायालयाच्या पायऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले होते. तर शिवसेना शाखा परिसर, नयन अपार्टमेंट परिसर, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाकडे जाणारा रस्ता तसेच अनेक निवासी व व्यावसायिक भाग पाण्याखाली गेल्याने नागरिकांना अक्षरशः घरात कैद व्हावे लागत आहे. जर, काही तासांच्या पावसाने संपूर्ण तालुक्याची दाणादाण उडत असेल, तर भविष्यात अतिवृष्टी झाल्यावर परिस्थिती किती भीषण होईल, याचीच चिंता नागरिकांधून व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर उरण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी सत्र न्यायालय परिसरासह विविध भागांना भेट देऊन अधिकाऱ्यांना तातडीने पाण्याचा निचरा करण्याचे, अडकलेल्या नागरिकांना मदत करण्याचे आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. मात्र, या संपूर्ण पूरस्थितीदरम्यान इतर अनेक शासकीय यंत्रणा ना पूरग्रस्त भागांची प्रभावी पाहणी करताना दिसल्या, ना नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसल्या. संभाव्य धोकादायक ठिकाणी सावधानतेचे फलक, वाहतूक नियंत्रण, सुरक्षिततेबाबत सूचना किंवा नागरिकांना सतर्क करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आल्याचेही दिसून आले नाही, अशी तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. तसेच, आपत्तीच्या काळात प्रशासनाचा समन्वय आणि जनजागृती ही तितकीच महत्त्वाची असताना संबंधित यंत्रणांची अनुपस्थिती अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, या संपूर्ण परिस्थितीला केवळ मुसळधार पाऊस जबाबदार नसून, गावोगावी झालेले कथित बेकायदेशीर भराव, खाड्या व समुद्रकिनारी नैसर्गिक जलमार्गांवर करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे, डेब्रिज टाकून समुद्र आणि खाड्या बुजविण्याचे प्रकार त्याचबरोबर नैसर्गिक नाल्यांची गळचेपी यामुळेच पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

नियम मोडणाऱ्यांमुळे सामान्यांना शिक्षा
आज नैसर्गिक जलमार्ग बुजले, नाले अडले, खाड्या अरुंद झाल्या आणि त्याचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. ज्यांनी नियम मोडले ते सुरक्षित, पण शिक्षा मात्र सामान्य उरणकरांना भोगावी लागत आहे, अशी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आता नागरिकांनी स्पष्ट मागणी केली आहे की, उरणमधील सर्व कथित बेकायदेशीर भराव, समुद्र व खाडी परिसरातील अनधिकृत बांधकामे, डेब्रिज टाकून तयार करण्यात आलेल्या जागांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. नैसर्गिक जलमार्ग अडविणाऱ्यांवर कठोर कारवाई करून ते मार्ग तातडीने मोकळे करण्यात यावेत. तसेच, शहरातील संपूर्ण जलनिस्सारण व्यवस्थेचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करून कायमस्वरूपी पूरनियंत्रण आराखडा तयार करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
Exit mobile version