नागोठण्यात पुराचे पाणी

| नागोठणे | वार्ताहर |

अंबा नदीचे पुराचे पाणी येथील ऐतिहासिक जुन्या पुलावरून गेल्याने वाहतूक बंद झाली. त्यामुळे नागोठण्याचा वरवठणे गावाशी संपर्क तुटला. तसेच येथील एस.टी. स्थानकासहीत लगतच असलेल्या टेम्पो स्टँड परिसरात, कोळीवाडा, बाजारपेठ व नागोठणेहून पेणकडे जाण्यासाठी असलेल्या गावातील मुख्य रस्त्यावर लेकव्हू हॉटेल समोर व महाड बाजूकडे जाणार्‍या रस्त्यावर मरीआईच्या मंदिरासमोर अशा दोन्ही बाजूकडील रस्त्यावर पुराचे पाणी आले होते. नागोठणे स्थानकात पाणी आल्याने एस.टी. वाहतूक नागोठण्यातील हायवेनाका येथून सुरू होती. याशिवाय नागोठण्याजवळील कोलेटी, शेतपळस गावाच्या परिसरातही पूरपरिस्थिती निर्माण झाली होती.

पुराचे पाणी वाढत असल्याने नागोठणेतील छ. शिवाजी महाराज चौक परिसरासह नागोठणे बाजार पेठेतील सर्व दुकानदार व नागरिकांनी तसेच आंबा नदी व खाडी किनारील गावचे ग्रामस्थांनी दक्षता बाळगून पाण्याची पातळी व परिस्थिती पाहून आपल्या कुटुंबासह सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे असे आवाहन नागोठणे ग्रामपंचायत व पोलीस यंत्रणेकडून करण्यात आले होते. तर नगोठण्यातील कोळीवाडा, लेकव्ह्यू हॉटेल परिसरातील वीज ट्रान्सफॉर्मरच्या ठिकाणी पुराचे पाणी आल्याने तेथील वीजपुरवठा सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आला होता.

अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडून नागोठण्यात पुराचे पाणी येण्यास सुरुवात झाल्याने येथील छ. शिवाजी महाराज चौक परिसरातील सर्व लहान-मोठे दुकानदार व बाजारपेठेतील दुकानदारांनी आपल्या सामानाची सुरक्षित स्थळी हलवाहलव करण्यास सुरुवात केली होती, तर नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासोबत पोलीस ठाण्याचे कर्मचारी, नागोठणे मंडळ अधिकारी भरत गुंड, तलाठी सचिन संबरी तसेच नागोठणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवून होते.

Exit mobile version