। नागोठणे । महेश पवार ।
गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणार्या मुसळधार पावसाने सुधागड तालुका व नागोठणे परिसराला झोडपून काढले. त्यामुळे येथील अंबा नदीने मंगळवारी (दि.12) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. अंबा नदीचे पुराचे पाणी संध्याकाळी नागोठणे येथील ऐतिहासिक जुन्या पुलावरून गेल्याने वाहतूक बंद झाली. त्यामुळे नागोठण्याचा वरवठणे गावाशी संपर्क तुटला.
नागोठण्यातील एस.टी. स्थानकासहीत लगतच असलेल्या टेम्पो स्टँड परिसरात, कोळीवाडा व नागोठणेहून पेणकडे जाण्यासाठी असलेल्या गावातील मुख्य रस्त्यावर लेकव्ह्यू हॉटेल समोर, महाड बाजूकडे जाणार्या रस्त्यावर, मरीआईच्या मंदिरासमोर अशा दोन्ही बाजूकडील रस्त्यावर पूराचे पाणी आले. याशिवाय नागोठण्याजवळील कोलेटी, शेतपळस गावाच्या परिसरातही पुर परिस्थिती निर्माण झाली होती.
हवामान खात्याने जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तरी नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील अंबा नदी व खाडी किनारीलगतच्या ग्रामस्थांनी दक्षता बाळगून पाण्याची पातळी व परिस्थिती पाहून सुरक्षित ठिकाणी आपल्या कुटुंबासाहित स्थलांतरित व्हावे, असे आवाहन यंत्रणेकडून करण्यात आले होते.
अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडून नागोठण्यात पुराचे पाणी येण्यास सुरुवात झाल्याने येथील छ. शिवाजी महाराज चौक परिसरातील सर्व लहान-मोठे दुकानदार व बाजारपेठेतील दुकानदारांनी आपल्या सामानाची सुरक्षितस्थळी हलवाहलव करण्यास सुरुवात केली. तर नागोठणे पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक नारायण चव्हाण यांच्यासोबत कर्मचारी तसेच नागोठणे ग्रामपंचायतीचे कर्मचारी पुर परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.