बहुपयोगी कारवीचा पुष्पोत्सव

पर्यटक आकर्षित

| पाली/बेणसे | वार्ताहर |

कारवी ही डोंगर उतारांवर वाढणारी झुडूप वजा बहुपयोगी वनस्पती आहे. जिल्ह्यातील डोंगर व जंगलात सध्या कारविला मोठ्या प्रमाणात एकत्रित बहर आला आहे. जांभळ्या रंगांची आकर्षक टपोरी फुले जंगल व डोंगराची शोभा वाढवत आहेत. त्यामुळे पर्यटक देखील आकर्षित होत आहेत. ही वनस्पती मातीची धूप रोखण्याचे काम करते. शिवाय हिच्या फांद्यांपासून आदिवासी व गरीब बांधव आपली घरे तयार करतात. कारवी जैवविविधता व जंगल संवर्धनास हातभार लावते असे असंख्य फायदे या वनस्पतीचे आहेत.

भर उन्हाळ्यात या झुडुपांच्या जाळीच्या छायेमुळे जंगलात फिरणे सुकर होते. डोंगर उतारावरून तोल सांभाळत उतरताना आधारासाठी कारवीची झाडे उपयोगी पडतात. कारवीची मुळे जमिनीत जाळी गुंफतात, ज्यामुळे वारा व पावसामुळे होणारी जमिनीची धूप आटोक्यात येते त्यामुळे भूस्खलनाचा धोका देखील कमी होतो. जमिनीत खोल शिरणारी कारवीची मुळे पाण्याचा जमिनीतील पाझर वाढवून भूजल स्तर वाढवण्यास हातभार लावतात. कारवीच्या दाट जाळीच्या आश्रयाला अनेक ऑर्किड आणि लिलीची फुलेझाडे बहरतात कारवी यांचे गुरांपासून संरक्षण करते. कारवीची पाने जनावरांच्या चाऱ्यास उपयोगी पडतात. तर अनेक कीटकांना खाद्य, निवारा आणि संरक्षण मिळते. वनस्पतीच्या बोंडामधील बिया पक्व झाल्या, की या झाडांचा आठ वर्षांचा जीवनकाल संपतो. एक ते चौदा वर्षे अंतराने फुलणाऱ्या कारवीच्या अनेक जाती आहेत.

जिल्ह्यातील जंगलात व डोंगर उतारावर कारवीची फुले मोठ्या प्रमाणात बहरली आहेत. विळे ताम्हिणी घाटात हा बहर अधिकच आहे. कारवीचा बहर साधारण दोन-तीन आठवडे टिकतो. ऊन वाढू लागले, की फुले करपतात व बहर ओसरू लागतो. फुलांमुळे पर्यटक अधिक आकर्षित होतात. स्थानिक आदिवासी कारवीच्या फांद्यांपासून कुडाची घरे करतात. कारवी पर्यावरण संवर्धनाचे महत्वपूर्ण काम करत आहे. तिचे जतन होणे आवश्यक आहे.

राम मुंडे, स्थानिक निसर्ग व पर्यावरण अभ्यासक, विळे, माणगाव

अनोखे वैशिष्ट्ये
कारवीचे अनोखे वैशिष्ट्य म्हणजे तिचे एकत्रित बहरने हे आहे. यावेळी सृष्टीचा एक अलौकिक रंग सोहळा असल्यासारखे वाटते. ही झाडे सलग सात वर्षे वाढतात आणि आठव्या वर्षी सर्व झाडे एकाच वेळी फुलतात. जांभळ्या रंगाची टपोऱ्या फुलांनी ही झाडे संपूर्ण बहरतात तेव्हा जंगल व डोंगर उतारांना जणूकाही जांभळ्या रंगांची चादर ओढल्याप्रमाणे वाटते. या फुलांमधे भरपूर पराग आणि मकर मिळत असल्यामुळे मधमाश्या या बहराच्या वेळी कारवीच्या जाळीवरच बसतात.

कुडाची घरे
कुडांचे घर बांधण्यासाठी सर्वात महत्वाची साधनसामर्गी म्हणजे कारवीच्या काठ्या. कारवीच्या काठ्यांना माती व शेण थापून तयार केलेल्या भिंती, तसेच मातीचे व बांबूच्या कौलारू छप्पर असलेल्या घरात थंडावा राहतो. उन्हाळ्यात तर ही घरे वरदानच ठरतात. कुडाच्या, मातीच्या व बांबूच्या घरांना इकोटुरिझम व कृषी पर्यटनासाठी खूप अधिक मागणी आहे.

Exit mobile version